खा. श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
ठाणे : श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारची संयुक्त चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रधानमंत्री यांना पत्राद्वारे केल्यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी देखील राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांच्या आरोपांवर हसायचे की रडायचे हेच समजत नाही. पत्राचाळ प्रकरणातील आरोपीच आता तक्रारपत्र लिहायला लागले आहेत, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना राऊत यांना लगावला आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रधानमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे. ठाण्यातील नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मदाय आयुक्तांकडे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार केली आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत गरजूंना रोख स्वरूपात मदत केली जाते, त्याचबरोबर मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. याचा खर्च कोट्यावधीमध्ये आहे. हा खर्च नेमका कोणत्या माध्यमातून येतो यावर धर्मदाय आयुक्तांनी प्रकाश टाकायला हवा, असे पत्र संजय राऊत यांनी प्रधानमंत्री यांना लिहिले आहे. हे गंभीर असून तत्काळ गुन्हा नोंद करून साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तत्काळ ईडी, सीबीआयकडे देऊन गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रातून केली आहे.
संजय राऊत यांच्या आरोपांना श्रीकांत शिंदे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी काय पत्र पाठवले ते मी वाचले नाही. मात्र आमच्या फाउंडेशनची इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवली आहे. राऊत यांना शिव्याशापशिवाय दुसरे सुचत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र दिले. त्यांचा विश्वास पंतप्रधान यांच्यावर वाढला आहे, हे यावरून दिसून येत आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी जे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत तेच पत्र लिहीत आहेत, असा टोलाही शिंदे यांनी लगावला आहे.
आजपर्यंत कोणाला मदत केली आहे का? असा सवाल शिंदे यांनी विचारला. तसेच पत्रेके घर मे रहनेवाले दुसरे को पत्र लिखा नही करते, असा टोलाही शिंदे यांनी राऊत यांना लगावला. राऊत यांनी पंतप्रधान यांना पाठवलेल्या पत्रामधील तपशील मोघम आहे. आज कोणतीच गोष्ट माहितीच्या अधिकारामध्ये लपत नाही, असे सांगत काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. त्यांच्यासाठी चांगला डॉक्टर बघा. त्याची देखील मदत वैद्यकीय कक्ष घ्यायला तयार आहे. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च वैद्यकीय कक्ष करेल, असे शिंदे यांनी सांगितले.