मन उडू उडू झालं या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. इंद्रा आणि दिपूच्या लव्हस्टोरीमध्ये प्रेक्षक चांगलेच गुंतले आहेत. मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे कलाकार देखील खूप खुश आहेत. हृताची मंदार देवस्थळी सोबत हि दुसरी मालिका असून या मालिकेला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे त्यामुळे हृताने आनंद व्यक्त केला.
मंदार देवस्थळी सोबत पुन्हा एकदा काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना हृता म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे कि मला पुन्हा एकदा मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. मंदार सरांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. ते प्रत्येक सीनचा एक वेगळा पैलू काढून समजावून सांगतात. एखादा सिन वाचल्यावर तो सिन कसा करायचा हा प्रश्न पडतो पण जेव्हा सर तो सिन समजावतात तेव्हा त्यातील पैलू देखील सांगतात. त्यामुळे मला रोमँटिक सिन करणं सोपं जातं. तसंच प्रेमकथा उत्तमरित्या छोट्या पडद्यावर दाखवणं हा मंदार सरांचा हातखंडा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही मालिकेचं कथानक अधिक उत्तमरित्या सादर करू शकतो.”