‘आयपीएल’चे साखळी सामने २६ मार्चपासून महाराष्ट्रात

स्टेडियममध्ये ४० टक्के प्रेक्षकांना परवानगी

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार असून, साखळी सामने महाराष्ट्रातील चार मैदानांवर खेळवण्यात येणार आहेत. सुरुवातीच्या सामन्यांसाठी ४० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे.

‘‘यंदा १० संघांचा समावेश असलेल्या ‘आयपीएल’ला शनिवार, २६ मार्चपासून सुरुवात होत आहे,’’ अशी माहिती गुरुवारी झालेल्या ‘आयपीएल’च्या प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर ‘आयपीएल’चे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी दिली.

यंदा लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आल्यामुळे ‘आयपीएल’मधील सामन्यांची संख्या ७४ झाली आहे. ‘आयपीएल’चे सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियमसह नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

‘‘महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सुरुवातीच्या सामन्यांना ४० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. करोना साथ आणखी नियंत्रणात आल्यास १०० टक्के प्रेक्षकांनाही सामने पाहता येऊ शकतील, अशी आशा आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.

बाद फेरीच्या सामन्यांच्या ठिकाणांबाबत कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आला नसला, तरी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर अंतिम सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.