लखनऊनचे गोलंदाज आवेश खान, कृणाल पांड्या यांनी हैदराबादला रोखून धरलं

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील हैदराबाद आणि लखनऊ यांच्यातील आजची लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यामुळे कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र लखनऊने दिलेले १७० धावांचे लक्ष्य हैदराबादला गाठता आले नाही. परिणामी लखनऊचा १२ धावांनी विजय झाला. या विजयासाठी लखनऊच्या गोलंदाजांनी मोठी मेहनत घेतली. आवेश खानने तब्बल ४ बळी घेत हैदराबाद संघाला खिळखिळं केलं. तर शेवटच्या षटकात जेसन होल्डरने आश्चर्यकारक गोलंदाजी करत सहा चेंडूंमध्ये हैदराबादच्या तीन फलंदाजांना बाद केलं. लखनऊच्या या विजयासाठी कर्णधार राहुलने केलेल्या ६८ धावांची खूप मदत झाली.

लखनऊने दिलेल्या १७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी हैदराबादचे अभिषेक शर्मा आणि केन विल्यम्सन सलामीला आले. मात्र ही जोडी मैदानावर जास्त काळ टिकू शकली नाही. दुसऱ्या षटकातच कर्णधार केन विल्यम्सनचा आवेश खानने बळी घेतला. फटका मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर चेंडू अँड्र्यूच्या हातामध्ये विसावल्यामुळे विल्यम्सन अवघ्या १६ धावा करुन झेलबाद झाला.

अभिषेक शर्मादेखील १३ धावांवर आवेश खानच्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर लागोपाठ मर्करामही झेलबाद झाला. एडन मर्करामने १४ चेंडूमध्ये १२ धावा केल्या. कृणाल पांड्याने टाकलेल्या चेडूवर मर्करामने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. के एल राहुलने अप्रतिम झेल टिपल्यामुळे मर्कराम १२ धावांवर बाद झाला.

दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या राहुल त्रिपाठीने डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. मोठे फटके मारत त्रिपाठीने १७० धावांकडे वाटचाल केली होती. मात्र मात्र कृणाल पांड्याने त्याचा बळी घेतला. ४४ धावांवर असताना त्रिपाठी झेलबाद झाला. त्रिपाठीने ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एक षटकार यांच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्रिपाठीनंतर निकोलस पुरनने संयम राखत फलंदाजी केली. तसेच संधी मिळताच तो मोठे फटके मारत धावा चोरत होता. मात्र ३४ धावांवर असताना आवेश खानच्या चेंडूवर पुरन झेलबाद झाला. त्यानंतर मात्र हैदराबादचा बुरुज ढासळत गेला. पुरननंतर पुढच्याच चेंडूमध्ये अब्दुल समद खातं न खोलता झेलबाद झाला. या बळीनंतर सामना लखनऊच्या बाजूने फिरला.

मात्र चौथ्या विकेटसाठी फलंदाजीला उतरलेल्या दीपक हुडाने शानदार खेळ केला. त्याने ३३ धावांत तीन षटकार आणि तीन चौकार यांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळ केला. तर दुसरीकडे फलंदाजीसाठी आलेला केएल राहुलने मैदानात घट्ट पाय रोवले होते. दीपक हुडा आणि केएल राहुल या जोडीने चांगली फलंदाजी करत लखनऊला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मदत केली. लखनऊ संघ ११४ धावसंख्येवर असताना दीपक हुडा ५१ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर संघाची १४४ धावसंख्या असताना केएल राहुल ६० धावांवर पायचित झाला.