४ षटकांत चार ४ गडी बाद, केकेआरचा पूर्ण संघ १२८ धावांवर गारद

आयपीएल १५ व्या हंगामातील सहावा सामना चांगलाच चुरशीचा होतोय. आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ एकमेकांशी दोन हात करत आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाला बंगळुरुच्या गोलंदाजांनी सळो की पळो करुन सोडले आहे. बंगळुरुच्या गोलंदाजांनी कोलकाताचा पूर्ण संघ अवघ्या १२८ धावांवर बाद केलाय. या कामात गोलंदाज वनिंदू हसरंगाने मोठी भूमिका बजावली असून त्याने तब्बल चार बळी घेतले आहेत.

वनिंदू हसरंगाने सुरुवातीपासून भेदक मारा केल्यामुळे केकेआरचे फलंदाज पुरते गोंधळून गेले. हसरंगाने चार षटकांत फक्त २० धावा देत तब्बल चार फलंदाजांना बाद केलंय. आकाश दीपने व्यंकटेश अय्यरला अवघ्या दहा धावांवर बाद केल्यानंतर सिराज अहमदने रहाणेला ९ धावांवर तंबुत पाठवले. त्यानंतर पुन्हा एकदा आकाश दीपच्या चेंडूवर नितिश राणा झेलबाद झाला. त्यानंतर मात्र हसरंगाने त्याची जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने श्रेयस अय्यरला अवघ्या १३ धावांवर बाद केले.

त्यापाठोपाठ कोलकाता संघ ६७ धावांवर असताना हसरंगाने नरेनला १२ धावांवर तंबुत पाठवले. हसरंगाने दोन बळी घेतल्यानंतर कोलकाताची स्थिती ६७ धावांवर पाच गडी बाद अशी झाली. त्यापाठोपाठ हसरंगाने लगेच जॅक्सनचा त्रिफळा उडवला. या बळीनंतर कोलकाताची स्थिती ६७ धावांवर सहा गडी बाद अशी झाली. त्यानंतर हसरंगाने पुन्हा एकदा आपली जादू दाखवत टीम साउथीने अवघी एक धाव केलेली असताना त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र कोलकाताची स्थिती फारच दयनीय झाली. कोलकाताने १२८ धावा केल्या असून बंगळुरुपुढे १२९ धावांचे लक्ष्य उभे केले.