आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अकरावा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात चेन्नई आणि पंजाब किग्ज या दोन संघांमध्ये लढत झाली. मात्र या सामन्यात चेन्नईचा लाजिरवणा पराभव झाला. पंजाबने दिलेले १८१ धावांचे लक्ष्य चेन्नईला गाठता आले नाही. चेन्नईचा पूर्ण संघ फक्त १२६ धांवावर तंबुत परतला. दरम्यान आजच्या सामन्यानंतर चेन्नईने लागोपाठ तीन सामने गमावले असून हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर गेला आहे.
पंजाबने दिलेले १८१ धावांचे लक्ष्य गाठताना चेन्नईची चांगलीच तारांबळ उडाली. हे लक्ष्य गाठण्यासाठी रॉबीन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड सलामीला उतरले. मात्र फक्त एक धाव करुन ऋतुराज झेलबाद झाला. रबाडाने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताना ऋतुराज बाद झाला. त्यानंतर रॉबिन उथप्पादेखील स्वस्तात बाद झाला. वैभव अरोराने टाकलेल्या चेंडूवर तो १३ धावा करुन तंबुत परतला.
नंतर ठराविक अंतराने चेन्नईचे फलंदाज बाद होत गेले. दुसऱ्या विकेटसाठी आलेला मोईन आली खातंदेखील खोलू शकला नाही. तीच स्थिती रविंद्र जाडेजाची झाली. जाडेजा बाद झाल्यानंतर चेन्नईची स्थिती २३ धावा चार बाद अशी झाली. अंबती रायडूदेखील फक्त १३ धावा करुन झेलबाद झाल्यामुळे चेन्नई संघ चांगलाच दबावाखाली आला. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी मैदानात महेंद्रसिंह धोनी आला. शिवम दुबे आणि महेंद्रसिंह धोनी या जोडीने नंतर डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेने ३० चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या. तर धोनीने २८ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या. राहुल चहरच्या चेंडूवर फटका मारताना जितेश शर्माने धोनीचा झेल घेतला.
धोनी बाद झाल्यानंतर मात्र चेन्नईच्या सर्व आशा मावळल्या. ड्वेन ब्राव्हो (०), ड्वेन प्रिटोरिअस (८), ख्रिस जॉर्डन (५), या शेवच्या फळीतील फलंदाज चमक दाखवू शकले नाहीत.
तर यापूर्वी नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल (४) धावांवर बाद झाला. लगेच दुसऱ्याच षटकावर पंजाब १४ धावांवर असताना भानुका राजपक्षे धावबाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना शिखर धवन डिजे ब्राव्होच्या चेंडूवर बाद झाला. त्याने २४ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. तर लियाम लिव्हिंगस्टोनने संघासाठी मोठा खेळ केला. लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकार यांच्या मदतीने ६० धावा केल्या. मात्र रविंद्र जाडेजाने टाकलेल्या चेंडूवर लिव्हिंगस्टोन झेलबाद झाला.
लियाम बाद झाल्यानंतर जितेश शर्माने १७ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. त्यानंतर मात्र पंजाबचा एकही खेळाडू मोठा खेळ करु शकला नाही. शेवटच्या फळीतील शाहरुख खान (६), ओडेन स्मिथ (३), रबाडा (१२, नाबाद), राहुल चहर (१२), वैभव अरोरा (१, नाबाद) या खेळाडूंनी साधारण कामगिरी केल्यामले वीस षटकांत पंजाब १८० धावांचे लक्ष्य उभे करु शकला.