नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या अध्यायाला शनिवारपासून मुंबईत प्रारंभ होत असून, स्टेडिमयमध्ये २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे, असे संयोजकांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. वानखेडे स्टेडियमवर २६ मार्चला गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. करोनाच्या साथीतून सावरल्यानंतर प्रथमच ‘आयपीएल’साठी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे.
‘‘मुंबईत वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम तसेच पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर हे सामने होणार असून, करोनाच्या शिष्टाचारांचे पालन करीत २५ टक्के प्रेक्षकांना ते पाहता येतील,’’ असे संयोजकांनी म्हटले आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या दोन नव्या संघांच्या समावेशामुळे यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये ७४ सामने होतील. यापैकी ७० साखळी सामने मुंबईत होणार आहेत. साखळी सामन्यांच्या तिकीट विक्रीला बुधवारपासून प्रारंभ झाला असून, http://www.iplt20.com आणि http://www.BookMyShow.com या संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.