सात महिन्यांत जेमतेम २४ टक्के वसुली
ठाणे: मागील काही महिन्यांत लोकहिताच्या अनेक योजनांमध्ये गुंतलेल्या ठामपा कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांचा ताण सोसवेना झाला असून त्याचा परिणाम कर वसुलीवर झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या सात महिन्यांत एकूण उद्दिष्टांच्या जेमतेम २४ टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचा काळ वगळता अवघ्या चार महिन्यांत उर्वरित ७६ टक्के वसुलीचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.
आधीच वसुलीबाबत पिछाडीवर असलेल्या पाणीपट्टी विभागाची वसुली निवडणूक काळातही थंडावली आहे. जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्याने याचा परिणाम वसुलीवरही झाला आहे. त्यामुळे पाणीपट्टी विभागाला दिलेल्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ २३.७२ टक्केच वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २२५ कोटींचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. मात्र पाणी पुरवठा विभागाने ४ नोव्हेंबरपर्यंत ५३ कोटी, ३८ लाख ७९ हजारपर्यंतची वसुली झाली आहे. त्यामुळे वसुलीची मोहीम अधिक वेगवान करण्यात येणार असल्याचे या विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पाणी बिलांची वसुली योग्य पध्दतीने व्हावी या उद्देशाने स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यानुसार १ लाख १४ हजाराहून अधिक मीटर बसवून झाले आहेत. परंतु झोपडपट्टी भागात आजही या मीटरनुसार बिलांची वसुली होतांना दिसत नाही.
त्यातही पाणी बिलांची वसुली करण्यासाठी अभय योजना हाती घेण्यात आली असली तरी देखील त्याला फारसे यश आले नसल्याचेच दिसून आले आहे. सर्वाधिक वसुली ही मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीच्या हद्दीत असून आठ कोटी ९१ लाख ८२,३२५ रुपये झाली आहे. सर्वात कमी वसुली ही दोन कोटी १६ लाख ३४,९३७ रुपये वागळे प्रभाग समितीत हद्दीत झाली आहे.
प्रभाग समितीनिहाय वसुली
प्रभाग समिती – रक्कम
वर्तकनगर – ४कोटी ६१लाख ६१ हजार
माजिवडा-मानपाडा – ८ कोटी ९१ लाख ८२ हजार
लोकमान्य-सावरकर नगर – ३कोटी ५६लाख ९८हजार
उथळसर – ४कोटी ३३लाख ६७हजार
नौपाडा-कोपरी – ५कोटी ७७लाख ७६हजार
मुंब्रा – ४कोटी ५२लाख ३०हजार
कळवा – ३ कोटी ५२ लाख ३२ हजार
वागळे – २कोटी १६लाख ३४हजार
दिवा – ४कोटी १०लाख ९५हजार
ऑनलाईन – ४कोटी ६३ लाख ७८हजार
मुख्यालय – ७कोटी २१लाख २६हजार
एकूण – ४७कोटी ४७लाख ३३हजार