* ७२ हजार रोजगार होणार उपलब्ध
* कोकण विभाग गुंतवणूक परिषद उत्साहात
ठाणे: नुकत्याच झालेल्या कोकण विभागीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून कोकण विभागामध्ये ८५०० कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्या माध्यमातून ७२ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
१२ मार्च २०२५ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन भवन येथे उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत झाले.
या परिषदेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३३१ उद्योग घटकांनी शासनासोबत सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारान्वये जिल्ह्यामध्ये ८५०० कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्यामध्ये ७२ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. या परिषदेमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी काही उद्योगांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले.
पालघर जिल्ह्यामध्ये १३८ उद्योग १४९२ कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून ४,७७७ रोजगार निर्माण होणार आहे. ठाणे जिल्ह्यात ६५ उद्योग ४,७८३ कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून ६४,०८२ रोजगार निर्माण होणार आहे. रायगड जिल्ह्यात 33 उद्योग ९३१.५ कोटींची गुंतवणूक कारणांवरून त्यातून १,६४७ रोजगार उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५२ उद्योग ९३६.२५ कोटींची गुंतवणूक करणार असून १,१२५ रोजगार उपलब्ध होणार आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ उद्योग ३१३.५६ कोटींची गुंतवणूक करणार असून त्यातून ८७२ रोजगार उपलब्ध होणार आहे.
या परिषदेत अनेक महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले, ज्यात मॅश एनर्जी इंडिया प्रा.लि. (७० कोटी), चीनकेइम लॅब (3 कोटी), गौसिया एक्सपोर्टर्स (२.५ कोटी), ग्रीन अमोनिया (१५० कोटी), फॅटी जनरल इक्विपमेंट प्रा. लि. (१५ कोटी), सनराईज कॉर्पोरेट पार्क (२२५ कोटी), श्री मौर्य गणपती आयडॉल फाऊंडेशन (१० कोटी), कॅनबेरा इंडस्ट्रीज (६५.६२ कोटी), वेलांकनी मशीन क्राफ्ट (१८ कोटी), ग्रीन-केन बांबू वर्ल्ड असोसिएशन (१० कोटी),पोशाख डिजिप्रिंट गारमेंट क्लस्टर (ठाणे) (२८.६८ कोटी), अकेंग डिझाईन अँड बिल्ड (पालघर) (२२ कोटी), ०२२ बिझिनेस आयटी पार्क (ठाणे) (३२२ कोटी), सायबर कोड (ठाणे) (२१५ कोटी) आणि श्री बायोटेक प्रॉडक्ट्स (सिंधुदुर्ग) (२.०३ कोटी) यांचा समावेश आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले की, कोकण विभाग हा भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. राज्यात पायाभूत सोयी सुविधा, समृध्दी महामार्ग, वाढवण बंदर निर्मिती यामुळे निर्यातीस प्रोत्साहन मिळत असून भविष्यात कोकण लॉजिस्टिक्स व शिपिंग हब म्हणून उदयास येईल.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्याचे बलस्थान लक्षात घेवून त्यानुसार उद्योग स्थापनेसाठी उद्योगांना सहाय्य करणे गरजेचे असून जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक वृद्धीसाठी उद्योगपूरक वातावरण निर्मिती करण्यावर भर देण्यात येईल. ज्यामुळे उद्योग घटकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
या कार्यक्रमासाठी कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, उद्योग उपसंचालक सीमा पवार, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष भालचंद्र रावराणे, तळोजा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष, कोकण विभागातील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सोनाली देवरे, उपेंद्र सांगळे, श्री.जी.एस. हरळय्या, श्रीपाद दामले, अजिंक्य आजगेकर तसेच जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयोजित चर्चासत्रात ठाणे मॅनेजमेंट फोरमचे संचालक श्री.मूर्ती, मिहिर गोठीकर, वृषाली साटम, कामगार अधिकारी सारिका राऊत, आयडीबीआय बँकेचे उमेश रणोलिया, युनियन बँकेच्या उप महाव्यवस्थापक श्रीमती जनानी, मैत्री नोडल ऑफिसर प्रदीप पाटील, न्यू इंडिया इन्शुरन्सचे नरेंद्र पाटील, संजीव सुमन यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.
या गुंतवणूक परिषदेचे प्रास्ताविक कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजनाबाबत शासनाचा उद्देश व त्याचा जिल्ह्याला होणारा फायदा, शासनाच्या विविध उद्योग पूरक योजना, निर्यात धोरण तसेच उद्योग विभागाने मागील वर्षात घेतलेली उतुंग भरारी याबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.