जिल्हाधिकाऱ्यांचा अजब प्रकार
ठाणे : तालुका क्रीडा संकुलात अनियमितता आणि मनमानी झाल्याचे आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी विधिमंडळात उघडकीस आणले होते. वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अनियमितता झाल्याचेही स्पष्ट झाले. पण कारवाई मात्र काहीच झाली नसून जिल्हाधिकारी टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला आहे.
तालुका क्रीडा संकुलावर १२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या संकुलातील कामात भ्रष्टाचार झाल्याचे श्री.केळकर यांनी विधिमंडळात पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी आणि कारवाईची मागणी केली होती. मात्र वर्षभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली, परंतु संबंधितांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केली. कारवाईबाबत दिरंगाई झाल्यावर श्री.केळकर यांनी स्मरणपत्र पाठवून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला, असा स्पष्ट आरोप श्री.केळकर यांनी केला. खेळाडूंना त्रास होऊ नये म्हणून सहा महिन्यांपूर्वीच संकुल सुरू करा, पण कारवाईचे आदेशही द्या, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. या सूचनेकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.