शिर्डी: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता साई संस्थानने घेतली आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला पालखी घेऊन किंवा विविध खासगी अथवा सार्वजनिक वाहनांनी येणाऱ्या भाविकांना वाटेत काही दुर्दैवी घटना घडल्यास पाच लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी ही घोषणा केली. शिर्डीत येणारे भक्त साईबाबांची लेकरे आहेत. पालखी घेऊन येणारे असोत किंवा वाहनाने, प्रत्येक भक्ताच्या सुरक्षिततेची जबाबदारी साईबाबांची आहे, हे लक्षात घेऊन साई संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
त्यासाठी शिर्डीला येणाऱ्या पालखी मंडळाने आपल्या मंडळाचे नाव, त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे, आधार क्रमांकासह संस्थानकडे अधिकृतरीत्या किंवा वेबसाइटवर नोंद केलेली असणे आवश्यक आहे, अशी माहिती गाडीलकर यांनी दिली.
ऑनलाइन भक्तनिवास रूम बुकिंग, व्हीआयपी आरती पास, दर्शन पास, सत्यनारायण पूजा पास, अभिषेक पूजा पास यापैकी एखाद्या सुविधेसाठी आगाऊ नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या सर्व साईभक्तांनाही योजनेचा लाभ मिळेल.