गायमुख घाट रस्त्याची तत्काळ डागडुजी-डांबरीकरणाचे निर्देश

घोडबंदर परिसरातील समस्यांबाबत महापालिकेत झाली बैठक

ठाणे: वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळायची असल्याने गायमुख घाट रस्त्याचे काँक्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुजी व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

गायमुख घाट ते फाउंटन हॉटेलपर्यंतचा रस्ता मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र, त्यावरील गायमुख घाट काँक्रिटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. या पार्श्वभूमीवर, आयुक्त सौरभ राव यांनी गायमुख घाट रस्त्याच्या डागडुजीकरण व डांबरीकरणाचे निर्देश दिले आहेत.

घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचे पुढील सत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी झाले. या बैठकीस, घोडबंदर रोड येथील ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड फोरम’चे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाठ, सहायक संचालक, नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, घोडबंदर रस्ता येथे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम, यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, मिरा- भाईंदर आणि नवी मुंबई येथील वाहतूक पोलीस अधिकारी, मेट्रो, महा मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी गायमुख घाट दुरुस्तीबद्दल सद्यस्थिती जाणून घेतली. पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार नसल्याने, हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ऐन पावसाळ्यात वाहतूक योग्य राहील, याची काळजी घ्यावी अशी सूचना केली. तसेच मेट्रो, सेवा रस्त्याचे एकत्रीकरण आणि भाईंदरपाडा व कासारवडवली उड्डाणपूल यांचे बांधकाम ही कामे सुरू असल्याने त्यात गायमुख रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची भर घालू नये, अशी सूचना प्रतिनिधींनी केली. त्याला प्रतिसाद देताना महापालिका आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून, तसेच वन विभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगीची सद्यस्थिती जाणून घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाबाबत वन विभागाने अधिकची माहिती मागवली आहे. या सगळ्या प्रक्रियेस लागणारा संभाव्य वेळ लक्षात घेऊन तुर्तास, येत्या पावसाळ्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असून त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने योग्य ती पावले उचलावीत, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी नेमण्यात आलेल्या वॉर्डनच्या संख्येबद्दल या बैठकीत चर्चा झाली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन पगाराविषयीचे प्रश्न सोडवून जास्तीत जास्त वॉर्डन रस्त्यावरती वाहतूक नियंत्रणासाठी उपयोगी येतील या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त यांनी मेट्रो तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

पावसाळ्याच्या काळामध्ये अवजड वाहनांची वाहतूक रात्री नऊनंतरच सुरू करावी. मुंबई आणि नवी मुंबईतून येणाऱ्या अवजड वाहनांविषयी समन्वय साधून त्यांचे नियंत्रण करण्यात यावे, अशी सूचना ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी केली. त्यासंदर्भात वाहतूक विभागाने अधिक चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आयुक्त राव म्हणाले.

दरम्यान, आनंदनगर येथील आरएमसी प्लांटकडे कोणत्याही परवानगी नसल्याने काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या आठवडी बाजाराला परवानगी देताना बाजार संपल्यानंतर श्रमदानाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करून तो परिसर स्वच्छ ठेवण्याची अट परवानगी देतानाच घातली जाईल, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. याशिवाय, प्रलंबित कामे, सीसीटीव्ही नेटवर्क, सिग्नल परिसरातील रस्त्यांची डागडुजी, खोदकाम करताना विविध यंत्रणांमधील समन्वय आदी मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली.