आयुक्तांकडून वागळे इस्टेट परिसरातील रस्ते, स्वच्छता व नालेसफाई कामांची पाहणी

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांच्या कामांची तसेच रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व साफसफाई कामांची पाहणी केली. तसेच या ठिकाणी झालेल्या नालेसफाईची पाहणी केली. सद्यस्थितीत नाल्यात वाहून येत असलेला कचरा काढण्यासाठी पुन्हा नालेसफाई करण्यात यावी, तसेच पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांची कामे करावीत व परिसरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेविका संध्या मोरे, मनिषा कांबळे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे,उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त शंकर पाटोळे, उपआयुक्त जी.जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त अजय हेडके, संबंधित कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी वागळे प्रभाग समिती कार्यालय येथून या पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली. त्यानंतर रोड नंबर -16, किसननगर नं. 2, किसननगर नं 3, भटवाडी, श्रीनगर, शिवटेकडी मॉडेला चेक नाका, वासुदेव बळवंत फडके मार्ग, पासपोर्ट ऑफिस, रोड नंबर-33, आयटीआय सर्कल, रामनगर, आंबेवाडी, इंदिरा नगर सर्कल तसेच राजीव गांधी नगर या ठिकाणच्या रस्त्यांची व साफसफाई कामांची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली.

वागळे इस्टेट प्रभाग सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा आढावा घेवून सुरू असलेली कामे पूर्ण करावीत. दुरुस्तीबरोबरच विविध सेवा सुविधांसाठी खोदण्यात आलेले रस्ते व साफसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिल्या.

यावेळी झाडांच्या फांद्यांची छाटणी, डेब्रिज उचलणे, अपूर्ण असलेली कामे तात्काळ करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबधितांना दिल्या.