मेट्रो मार्गाची आ.गीता जैनसह आयुक्तांकडून पाहणी

भाईंदर : दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग क्रमांक ९ च्या कामाचा आढावा घेण्यासाठी आ. गीता जैन यांच्यासह मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी पालिका व एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

यावेळी आ. जैन यांनी या मार्गावरील काम जलदगतीने पुर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केल्या. मीरा-भाईंदर शहरात दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभासचंद्र बोस मैदान दरम्यान मेट्रो प्रकल्प ९ चे काम सप्टेंबर २०१८ पासून सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे तेथील समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी
खड्डे पडले आहेत. हाच रस्ता तयार करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्पांतर्गत २२ कोटींचा निधी मेट्रोचे ठेकेदार मेसर्स जे. कुमार अॅन्ड कंपनीला गतवर्षी दिला होता. त्यातून रस्ता दुरुस्तीचे कामही पुर्ण करण्यात आले. मात्र हा रस्ता यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा खड्डेमय झाल्याने ठेकेदाराने रस्ते दुरूस्ती निकृष्ट दर्जाची केल्याचा आरोप सर्वच स्तरातून होऊ लागला आहे. या अनुषंगाने आ. गीता जैन यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह पालिका व एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत सोमवारी मेट्रो कामाचा आढावा घेण्यासाठी पाहणी केली. यावेळी जैन यांनी मेट्रोच्या कामामुळे रस्त्याच्या दुरावस्थेकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

मेट्रो मार्गातील अनेक ठिकाणी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बोरवेल खोदल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आ. जैन यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांना दिले. मेट्रो कामामुळे अपघात होऊ नये, यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणी जुन्या व तुटलेल्या संरक्षक जाळ्यांच्या जागी नवीन बॅरिकेट्स बसविण्याची सूचना ठेकेदाराला केली. तसेच त्यावर वाहन चालकांसह पादचाऱ्यांच्या माहितीकरीता योग्य माहिती नमूद करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.