पदोन्नतीच्या परीक्षेत कर्मचाऱ्यांचा कॉपीसाठी हट्ट आणि गोंधळ

नाशिक केंद्रातील पर्यवेक्षकांनी ठामपाकडे केली कारवाईची मागणी

ठाणे: वेतनवाढ, पदोन्नती याकरिता आवश्यक असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या परीक्षेत धिंगाणा घालून कॉपी करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणणाले आहेत.

ठाणे महापालिकेतील बाळू मुंडे, सुनिल खरपडे हे दोन लिपिक आणि वाहन चालक मुक्तेश बागुल यांची मागिल आठवड्यात लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या परीक्षेला बसले होते. त्यांचे परीक्षा केंद्र नाशिक येथे होते. दरम्यान या तिघांनी परीक्षा पर्यवेक्षकांना परीक्षेत मोबाईल वापरण्याची तसेच कॉपी करण्याची परवानगी मागितली होती, परंतु पर्यवेक्षकांनी त्यांना असे करता येणार नसल्याचे सांगितल्याने या तिघांचा पारा चढला. या तिघांनी जोरजोरात आरडाओरड केली आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्युटमधील अधिकारी-शिक्षक पैसे घेऊन कर्मचाऱ्यांना पास करतात, आमच्याकडून देखिल पैसे घेऊन आम्हाला पास करा असे सांगून पैशाचे आमिष दाखवले, परंतु त्याचा परिणाम पर्यवेक्षकांवर झाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली, अशी लेखी तक्रार नाशिक येथिल ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

या कर्मचाऱ्यांच्या विरोधात पोलिसांना तक्रार केली असती, त्यामुळे ठाणे महापालिकेची बदनामी झाली असती म्हणून परीक्षेत कॉपी केल्याची तक्रार केली नाही. परंतु या कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करावी,अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर आता महापालिका आयुक्त कोणती भूमिका घेतात याकडे महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.