मैत्रिणीसह सात जणांवर गुन्हा
कल्याण : कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २१ वर्षीय तरुणीवर तब्बल १० दिवस नशेच्या इंजेक्शनद्वारे बेशुद्ध ठेवून सात जणांकडून सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात तरुणीच्या ओळखीच्या दोन महिला आणि पाच पुरुषांचा सहभाग असून टिटवाळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ मार्च रोजी रात्री घरगुती वादानंतर संबंधित तरुणी आपली मैत्रिण जिनत हिच्या बनेली येथील घरी गेली. त्यावेळी जिनतच्या घरी तिची दुसरी मैत्रीण शबनमसुद्धा उपस्थित होती. त्याठिकाणी पिडीत महिला ही काही दिवस राहिली. यानंतर २५ मार्च रोजी सकाळी संबंधित तरुणीने घरी जायचे आहे, असे सांगितल्यावर जिनत आणि शबनमने तिला “आपण तुला गाडीने घरी सोडतो” असे सांगितले. त्यांनी फोन करून गुड्ड या इसमाला बोलावले आणि गुड्ड काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीने जिनत, शबनम, गुलफामसह आले.
पिडीत तरुणी गाडीत बसली असता तिला घरी नेण्याऐवजी आंबिवलीतील एनआरसी कॉलनीजवळील एका चाळीत घेऊन गेले. तिथे ‘चाळीतील रूम बघू आणि मग घरी जाऊ’ असे सांगून तिला खोलीत नेण्यात आले. त्या खोलीत शबनमने पिडीत तरुणीच्या मानेला नशेचे इंजेक्शन दिले. त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती रामबाग, कल्याण येथील लियाकत नामक इसमाच्या रेस्ट रूममध्ये होती. ती पूर्णतः नग्न अवस्थेत होती ज्यावरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे तीला जाणवल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुढील चार दिवस ती अर्धशुद्ध अवस्थेत होती, तिला सातत्याने नशेचे इंजेक्शन दिले जात होते. दरम्यान जिनत, शबनम, गुड्ड, गुलफाम, लियाकत आणि एक अनोळखी इसम वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होते. तिला बिअर पाजून, बळजबरी करून, संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले गेले. या अत्याचारात लियाकतच्या रेस्ट रूमचा अनेक वेळा वापर करण्यात आला. त्या ठिकाणी नेऊन वारंवार तिला नशा देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच गुड्ड या इसमाने अली ईराणी याला फोन करून “जर तू काही सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. त्याच दडपणाखाली पीडित तरुणीने सुरुवातीस आपल्या दादीविरोधात खोटी तक्रार सुद्धा दाखल केली.
पुढे ३ मे रोजी रात्री १२ वाजता शुद्ध आल्यावर तिने स्वतःला एका कुलूपबंद खोलीत बंद केलेले पाहिले. जोरजोराने रडल्यावर बाहेरून जात असलेल्या एका इसमाने कुलूप फोडून तिला बाहेर काढले व घरी सोडले. या अमानुष घटनेत आरोपी म्हणून जिनत, शबनम, गुड्ड, गुलफाम, लियाकत, अली ईराणी आणि एक अनोळखी इसम यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.