नवी मुंबई : पावसामुळे वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. गुरुवारी १०० गाड्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या घाऊक दरातही ३० ते ४० टक्के वाढ झालेली आहे.
पुणे, नाशिक, गुजरात येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो; परंतु त्या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. पुणे, सातारा, नाशिक, नागपूर तसेच गुजरातमध्ये जोरदार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होत नदीकाठच्या काही गावांचे संपर्क तुटले आहेत. त्यामुळे एपीएमसी बाजारात भाजीपाला आवकवर परिणाम झाला आहे.
बाजारात नियमित ५०० ते ५५० गाडी भाजीपाला येत असतो. गुरुवारी फक्त ४०६ गाड्यांची आवक झाली. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दरात वाढ झाली आहे. आवक कमी होत असल्याने पावसामुळे भाज्या खराब होण्याचे प्रमाणही अधिक झालेले आहे. मागील दोन दिवसांपासून परराज्यात तसेच राज्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे नाशिक, पुणे, तसेच गुजरात येथून भाजीपाला आवक होत नाही. त्यामुळे घाऊक दरात वाढ झालेली आहे, असे भाजीपाला व्यापारी नाना बोरकर यांनी सांगितले.