कोकणपाठोपाठ सांगली, सोलापूरमधूनही आंबा दाखल
नवी मुंबई: कोकणातील हापूस आंबा जसा प्रसिद्ध आहे, तसाच गुजरातचा केसर आंबाही प्रसिद्ध आहे. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपायला लागला की, गुजरातमधून या केसर आंब्याची आवक बाजारात सुरू होते. मात्र, यावर्षी गुजरातच्या आंब्याआधीच राज्यातील कोकण, सांगली, सोलापूरमधील केसर आंब्याची आवक वाशीच्या घाऊक फळ बाजारात सुरू झाली आहे.
गुजरातचा केसर आंबा चवीला गोड असल्याने हापूस खालोखाल बाजारात या आंब्याला मागणी असते. त्यातही गुजराती, मारवाडी लोक आपल्या राज्यातील आंबा म्हणून या आंब्याची खास खरेदी करतात. केसर आंबा काहीसा लांबट असल्याने आणि त्याच्या सुगंधाने लगेच ओळखता येतो. त्यामुळे आंबाप्रेमी आवर्जून केसर आंबा खरेदी करतात. कोकणातील शेतकऱ्यांसोबत सातारा, सांगलीमधील शेतकऱ्यांनीही आपल्या शेतात केसर आंब्याची कलमे लावली आहेत. या कलमाना आत्ता फळे येऊ लागली आहेत. महाराष्ट्रात आंब्याचा हंगाम हा उन्हाळ्यात असतो. याच काळातील हवामानात आंबा तयार होतो. त्यानुसार इथे लावलेल्या हापूसच्या कलमांबरोबर केसर आंबाही तयार झाला आहे. आता तो बाजारात यायला सुरुवात झाली आहे. गुजरातहून अजून हापूस आंबा यायला सुरुवात झालेली नाही.
यावर्षी बाजारात हापूस आंब्याच्या अगोदर केसर आंब्याची पहिली पेटी कोकणातून दाखल झाली होती. तिला दरही चांगला मिळाला होता. ज्याप्रमाणे हापूस आंब्याची निर्यात होते, तशीच केसर आंब्यालाही परदेशात मागणी आहे. त्यामुळे आखाती देशांत केसर आंब्याची निर्यात होते. तिथले गुजराती, मारवाडी लोक आवर्जून हा आंबा मागवतात. त्याआधी यावर्षी राज्यातून आलेला केसर आंबा बाजारात भाव खात आहे.
घाऊक बाजारात केसर आंबा १०० ते २०० रु. किलो आहे. मात्र, काही व्यापाऱ्यांकडे हा आंबा पेटीमध्ये डझनाच्या हिशेबाने विकला जात आहे.
केसरी, हापूस आंबा सध्या बाजारात दाखल होत आहे. १५ मे नंतर या आंब्याची आवक वाढणार आहे. जून अखेरपर्यंत या आंब्याची चव ग्राहकांना चाखता येणार आहे. सध्या पिकलेल्या आंब्याचे दर घाऊक दरापेक्षा अधिक आहेत, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.