कल्याण : कल्याण ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतील टिटवाळ्यात बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गोळीबार झालेल्या ठिकाणी पादचाऱ्यांची एकच पळापळ झाली. तर या घटनेनंतर भयभीत रहिवाश्यांनी आपापल्या घरांचे खडकी-दरवाजे लावून घेतले.
टिटवाळ्यातील वाजपेयी चौकातून बल्याणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रवींद्र आर्केडसमोर काही तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर या तरुणांतील दोन गटांत गोळीबार झाला. गोळीबार करणाऱ्या तरुणांनी बल्यानीच्या रस्त्यावर पळ काढला. तर ज्यांच्यावर गोळीबार केला गेला ते मोठ-मोठयाने आरडा-ओरडा करत टिटवाळा पोलिस ठाण्याच्या दिशेने धावत सुटले. कुणी कुणावर गोळीबार केला याचा अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही.
प्राथमिक माहितीनुसार गोळीबारानंतर जमीनीवर बंदुकीतील पुंगळी रस्त्यावर पडलेली आढळून आली. सर्वत्र शांतता पसरल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी केली. टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रिकामी पुंगळी ताब्यात घेतली. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता गोळीबार झाला का याबाबत पोलीस तपास करीत असून याप्रकरणी एकाला अटक केले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.