पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार
नवी दिल्ली: या आधी व्होट बँकेचा विचार करुन निर्णय घेतले जात नव्हते. पण आम्ही राष्ट्रहितासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या. आधी भारताच्या हक्काचे पाणी भारताला मिळत नव्हते. पण आता भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार, थांबणार आणि भारताच्याच उपयोगी येणार असा निर्धार व्यक्त करत नरेंद्र मोदींनी भारताच्या धोरणाची दिशा निश्चित केली. एबीपी नेटवर्कच्या India@2047 परिषद कार्यक्रमात ते बोलत होते.
बदलत्या भारताचे सर्वात मोठं स्वप्न आहे आणि ते म्हणजे 2047 सालापर्यंत विकसित होणं. आपल्याकडे सामर्थ्य, संसाधन आणि इच्छाशक्ती आहे. जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असं विवेकानंद यांनी म्हटलं होतं. आज तिच जिद्द प्रत्येक भारतीयात दिसते.
ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. त्यामध्ये इंडिया यूके फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवर अंतिम निर्णय झाला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या आधी ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि इतर देशांसोबतही असा करार करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आज जगासोबत चालत एक लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर आहे.
देशाच्या सामर्थ्यावर आपल्याला भरोसा केला पाहिजे. पण अनेक दशकांपासून या गोष्टी न झाल्यामुळे, मोठे निर्णय न झाल्यामुळे नुकसान झालं. या आधी फक्त सत्ता आणि व्होट बँकचा विचार करण्यात आला. त्यामुळे मोठे निर्णय आणि मोठ्या सुधारणांचा निर्णय घेण्यात आलाच नाही.
राष्ट्र प्रथम हा एकमेव निकष समोर असेल तर देशाचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. गेल्या दशकभरापासून हेच लक्ष्य ठेऊन आम्ही काम करत आहोत. गेल्या अनेक दशकांपासून ज्या गोष्टी झाल्या नाहीत, राजकीय परिस्थितीमुळे जे निर्णय होऊ शकले नाहीत त्यावर आम्ही निर्णय घेतला.
या आधी बँकांना होणाऱ्या तोट्यासंबंधी कुणीही अक्षर काढत नव्हतं. 2014 पूर्वी भारतातील बँकिंग क्षेत्र हे विस्कळीत झालं होतं. पण आम्ही मोठे निर्णय घेतले, त्यामध्ये सुधारणा केल्या. देशहितामध्ये लहान बँकांचे विलिनीकरण केलं आणि त्यांचे सामर्थ्य वाढवलं. त्यामुळे आज भारतीय बँकिंग व्यवस्था ही जगातील एक बळकट व्यवस्था समजली जाते.
एअर इंडियाच्या उदाहरणावरुन ही गोष्ट स्पष्ट होते. कायम तोट्यात असलेल्या एअर इंडियावर कोणताही निर्णय होत नव्हता. आम्ही निर्णय घेतला आणि त्यामध्ये मोठा बदल झाला.
या आधी एक रुपया दिल्लीवरून निघाला तर त्यातील केवळ 15 पैसे हेच गरिबापर्यंत पोहोचायचे. आमच्या काळात पूर्ण 100 पैसे हे गरिबांपर्यंत पोहोचतात. या याधी 10 कोटी लोक असे होते की ज्यांची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी गरिबांसाठी असलेल्या सुविधांचा लाभ घेतला. आमच्या सरकारने या बोगस गरिबांना शोधून काढलं आणि खऱ्या गरिबांना सुविधा दिल्या. त्यामुळे देशाचे साडेतीन लाख कोटी रुपये वाचले. वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.
मुस्लिम महिलांच्या हितासाठी आम्ही तिहेरी तलाकवर कायदा बनवला. त्याची गरज होती. पण व्होट बँकेवर लक्ष ठेवून आधी निर्णय घेतला गेला नव्हता. आता वक्फ बोर्डच्या नव्या कायद्यानुसारही आम्ही खऱ्या मुस्लिम लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
आम्ही राज्य सरकारांच्या मदतीने देशभरात नदी जोड प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे लाखो परिवार, शेतकरी यांना त्याचा फायदा झाला. पूर्वी भारताचं हक्काचं पाणी बाहेर जात होतं. पण आता भारताचं पाणी भारताच्या हक्कासाठी रोखलं जाईल आणि भारताच्याच उपयोगात येईल.