अभिषेक शर्माची वादळी खेळी
भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी आणि अभिषेक शर्माची वादळी फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी-२० सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला आहे. तिलक वर्माच्या विजयी चौकारासह भारताने इंग्लिश संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. अभिषेक शर्माने ३४ चेंडूत ७९ धावांची विस्फोटक फलंदाजी करत भारताला सहज मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने इंग्लंडच्या एकापेक्षा एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांची परिक्षा घेतली आणि त्यात भारताचे फलंदाज अव्वल गुणांनी पास झाले. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो भारतीय संघाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे योग्य असल्याचं सिद्ध केलं. इंग्लंडचा संघ २० षटकांत १३२ धावा करून सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने ३ तर अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
भारताच्या टी-२० संघाने गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी तिन्ही क्षेत्रांमध्ये या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर विकेट भारतीय संघाचे मनसुबे जाहीर केले. यानंतर जोस बटलरने एका टोकाकडून संघाचा डाव सावरला खरा पण त्याला कोणत्याच फलंदाजी चांगली साथ मिळाली नाही. बटलर आणि हॅरी ब्रुकने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. पण वरूण चक्रवर्तीने एकाच षटकात क्लीन बोल्ड करत २ विकेट्स घेत इंग्लंडच्या पुनरागमनाचे दरवाजे बंद केले. अर्शदीप वरूणनंतर भारताच्या इतर गोलंदाजांनी झटपट विकेट घेण्यात हातभार लावला. जोस बटलरने ४४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अशारितीने इंग्लंडच्या डावात भारताने पूर्णपणे आपला दबदबा कायम राखला.
टीम इंडियाच्या १३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामीची जोडी मैदानात आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची झटपट भागीदारी पाहायला मिळाली. सॅमसन २६ धावा करून बाद झाला, तर अभिषेकने एका टोकाकडून डाव सांभाळून वेगवान धावा करत इंग्लंडला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. अभिषेकच्या बॅटमधून ७९ धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली, तर भारतीय संघाने हे लक्ष्य १२.५ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले.