भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : भारताचे एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश

मुंबईकर श्रेयस अय्यर (१११ चेंडूंत ८० धावा), यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (५४ चेंडूंत ५६) यांची अर्धशतके आणि गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजला ९६ धावांनी धूळ चारली. भारताने ही मालिका ३-० अशा फरकाने जिंकली.

भारताने दिलेल्या २६६ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा डाव ३७.१ षटकांत १६९ धावांत आटोपला. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. भारताने विंडीजविरुद्ध प्रथमच एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आला. कर्णधार रोहित शर्मा (१३), विराट कोहली (०) यांना अल्झारी जोसेफने चौथ्याच षटकात माघारी पाठवले. तर अनुभवी धवनसुद्धा (१०) १०व्या षटकात बाद झाला. ३ बाद ४२ धावांवरून अय्यर आणि पंत यांनी चौथ्या गडय़ासाठी ११० धावांची भागीदारी रचली. अय्यरने नववे, तर पंतने पाचवे अर्धशतक झळकावले. हेडन वॉल्शने पंतला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही (६) स्वस्तात परतला.

त्यामुळे अय्यरवरील दडपणात वाढ झाली आणि तोसुद्धा मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉल्शच्या गोलंदाजीवर बाद झाला. मग सुंदर आणि चहर यांनी सातव्या गडय़ासाठी ५३ धावांची भर घालून भारताला अडीचशे धावांपलीकडे नेले. जेसन होल्डरने मोहम्मद सिराजचा त्रिफळा उडवून भारताचा डाव ५० षटकांत २६५ धावांवर गुंडाळला.
लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजने सातत्याने बळी गमावले. ८ बाद १२२ धावांवरून हेडन वॉल्श (१३) आणि जोसेफ यांनी ४७ धावांची भागीदारी करून भारताला झुंजवले. मात्र त्यांना विजयीरेषा ओलांडता आली नाही. कृष्णाने जोसेफला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत सर्व बाद २६५ (श्रेयस अय्यर ८०, ऋषभ पंत ५६; जेसन होल्डर ४/३४) विजयी वि. वेस्ट इंडिज : ३७.१ षटकांत सर्व बाद १६९ (ओडेन स्मिथ ३६; प्रसिध कृष्णा ३/२७, मोहम्मद सिराज ३/२९)
’ सामनावीर : श्रेयस अय्यर
’ मालिकावीर : प्रसिध कृष्णा

राहुल, अक्षर ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार

भारताचा उपकर्णधार के. एल. राहुल आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल वेस्ट इंडिजविरुद्ध १६ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहुलच्या मांडीचा स्नायू दुखावला, तर अक्षर सध्या करोनातून सावरत आहे. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.