मुंबईकर श्रेयस अय्यरच्या सलग तिसऱ्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाहुण्या श्रीलंकेवर सहा गडी आणि १९ चेंडू राखून मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादले.
धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने दिलेले १४७ धावांचे आव्हान भारताने १६.५ षटकांत पूर्ण करत ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सलग १२व्या विजयाची नोंद केली. तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निर्भेळ यशासह ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची ही भारताची सलग तिसरी वेळ ठरली. त्यांनी याआधी घरच्या मैदानावरच न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या संघांना ट्वेन्टी-२० मालिकेत प्रत्येकी ३-० अशी धूळ चारली होती.
रविवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १४६ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्या डावाची खराब सुरुवात झाली. मोहम्मद सिराजने पहिल्याच षटकात दनुष्का गुणथिलकाला (०) माघारी पाठवले. तर युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने या सामन्यात मिळालेल्या संधीचे सोने करताना पथुम निसंका (१) आणि चरिथ असलंकाला (४) झटपट पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसेच लेग-स्पिनर रवी बिश्नोईने जनिथ लियांगेला (९) बाद केल्याने श्रीलंकेची ४ बाद २९ अशी स्थिती झाली. मात्र, कर्णधार दसुन शनकाने ३८ चेंडूंतच नाबाद ७४ धावांची खेळी करत श्रीलंकेला सावरले. त्याला आधी दिनेश चंडिमल (२२) आणि मग चमिका करूणारत्ने (नाबाद १२) यांची साथ लाभल्याने श्रीलंकेने सन्मानजनक धावसंख्या केली.
१४७ धावांचा पाठलाग करताना रोहित (५) आणि इशान किशनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या संजू सॅमसनला (१८) खेळपट्टीवर फार काळ टिकता आले नाही. परंतु श्रेयसने कामगिरीत सातत्य राखताना मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. त्याने ४८ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने नाबाद ७३ धावांची खेळी करत ट्वेन्टी-२० संघातील स्थानासाठी आपली दावेदारी अधिक भक्कम केली. तो तिन्ही सामन्यांत नाबाद राहिला. त्याने दीपक हुडा (२१) आणि रवींद्र जडेजा (नाबाद २२) यांच्या साथीने भारताचा विजय सुनिश्चित केला.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : २० षटकांत ५ बाद १४६ (दसुन शनका नाबाद ७४, दिनेश चंडिमल २२; आवेश खान २/२३, मोहम्मद सिराज १/२२) पराभूत वि. भारत : १६.५ षटकांत ४ बाद १४८ (श्रेयस अय्यर नाबाद ७३, रवींद्र जडेजा नाबाद २२; लाहिरू कुमारा २/३९)
सामनावीर/मालिकावीर : श्रेयस अय्यर
१२ भारताचा हा सलग १२ वा ट्वेन्टी-२० विजय ठरला. यासह सर्वाधिक सलग ट्वेन्टी-२० सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान आणि रोमेनियाच्या विक्रमाशी भारताने बरोबरी केली आहे.
१२५ भारताचा कर्णधार रोहित शर्माचा हा १२५वा ट्वेन्टी-२० सामना होता. त्याने शोएब मलिकला मागे टाकत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.