रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय महिलांनी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या महिला संघावर 19 षटकांत पाच गडी आणि एक षटक शिल्लक असताना 127 धावांचा पाठलाग करताना अखेरीस विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडने आपल्या संघात चार बदल केले. डॅनिएल वायट आणि नॅट सिव्हर-ब्रंट यांच्या अनुपस्थितीत, कर्णधार हीदर नाइटने आघाडीच्या फलंदाजीने 42 चेंडूत 52 धावा केल्या. नाइटला आठव्या षटकात अमनजोत कौरच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक रिचा घोषने जीवनदान दिले. तेव्हा इंग्लंडच्या कर्णधाराने केवळ एक रन केला होता. तिने भारताला याची चांगलीच भरपाई करायला लावली. तिने अतिरिक्त 51 धावा केल्या आणि इंग्लंडला 20 षटकात 126 धावांची स्पर्धात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली. रेणुका सिंग ठाकूरने डावाच्या पहिल्याच षटकात पुन्हा विकेट काढली. तिने असे या मालिकेत दोनदा केले. या वेगवान गोलंदाजाने पहिले माया बुशीअरला गोल्डन डक वर तंबूत पाठवले आणि नंतर स्पेलच्या दुसऱ्याच षटकात सोफिया डंकलेला (11). मात्र, नाइट आणि यष्टिरक्षक एमी जोन्स (२५) यांनी एकत्र येऊन डाव सांभाळला. ही भागीदारी फार काळ टिकली नाही कारण फिरकीपटू श्रेयंका पाटील (३/१९) आणि सायका इशाक (३/२२) यांनी आपापसात सहा गडी बाद केले आणि आठ षटकांत फक्त ४१ धावा दिल्या. पूजा वस्त्राकरच्या जागी आलेल्या अमनजोत कौरने तीन षटकात २५ धावा देऊन दोन गाडी बाद केले. डावाच्या शेवटच्या आणि शेवटून दुसऱ्या चेंडूवर तिला विकेट्स मिळाल्या.
127 धावांचा पाठलाग करताना भारताने तिसर्याच षटकात सलामीची फलंदाज शफाली वर्मा (6) गमावली. डाव्या हाताची वेगवान गोलंदाज फ्रेया केम्पने शेफालीची दांडी गुल केली. भारताचा स्कोर होता ११/१ आणि मैदानावर आली मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स. तिने स्मृती मानधनासोबत हातमिळवणी करत दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भक्कम भागीदारी केली. सरावासाठी सामन्याच्या दिवशी मैदानावर पोहोचणाऱ्या भारतीय संघातून पहिली ठरलेल्या मानधनाने सर्वाधिक ४८ धावा केल्या. हरमनप्रीत कौर १००% तंदुरुस्त नसल्यामुळे दीप्ती शर्मा (१२) हिला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षण करताना हरमनप्रीतला 16व्या षटकात घोट्याला दुखापत झाली. कौरला मात्र 27 चेंडूत 33 धावांची गरज असताना पाचव्या क्रमांकावर येण्यास भाग पाडले. कौर 8 चेंडूत 6 धावा करून नाबाद राहिली तर तिची सहकारी अमनजोत कौरने 4 चेंडूत तीन चौकारांसह अपराजित 13 धावा केल्या. इंग्लंडने नॅट सिव्हर-ब्रंट, लॉरेन बेल आणि सारा ग्लेन (अंगठ्याला दुखापत) यांना या सामन्यासाठी विश्रांती दिली होती आणि म्हणून त्यांची गोलंदाजी हवी तितकी तिखट नव्हती. फ्रेया केम्प (२/२४) आणि सोफी एकलस्टन (२/४३) यांनी आपली भूमिका बजावली पण शेवटी भारतीय फलंदाजी त्यांच्यासाठी चांगली ठरली. पहिल्या क्रमांकाची टी-20 गोलंदाज एकलस्टनने चार षटकांत ४३ धावा लुटल्या आणि तिच्या टी-२० करिअर मध्ये हे धावसंख्याच्या दृष्टीने सर्वात वाईट प्रदर्शन होते.
भारताच्या श्रेयंका पाटीलला उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाला. भारताने तिसरी टी-20 जिंकली पण इंग्लंडने मालिका 2-1 ने जिंकली.
पहिल्या दोन टी-20 मध्ये भारताची निराशाजनक कामगिरी असूनही, वानखेडे स्टेडियमवर वूमन इन ब्लूला पाठिंबा देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने जमले होते. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसर्या टी-20 सामन्यापेक्षा गर्दी जास्त होती. हरमनप्रीत कौर आणि तिच्या सहकाऱ्यांनी कठोर संघर्ष केला. भारतीय खेळाडूंनी घेतलेली प्रत्येक विकेट आणि प्रत्येक धावेवर चाहत्यांनी जल्लोष केला.
पुढच्या टप्प्यात दोन्ही संघ एक कसोटी सामना 14 ते 17 डिसेंबर दरम्यान नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळणार आहेत आणि टीम इंडिया पुन्हा मोठ्या लोकसमुदायाची आशा करेल जो त्यांना पाठिंबा देईल.