भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका :आफ्रिकेकडून भारताचा पराभव

नवी दिल्ली : रासी व्हॅन डर डसेन (४६ चेंडूंत नाबाद ७५ धावा) आणि डेव्हिड मिलर (३१ चेंडूंत नाबाद ६४) यांच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताचा सात गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला.दिल्ली येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेले २१२ धावांचे आव्हान पाहुण्या आफ्रिकेने १९.१ षटकांत गाठले. या विजयासह आफ्रिकेने पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बव्हुमाला (१०) लवकर बाद झाला. त्यानंतर िक्वटन डीकॉक (१८ चेंडूंत २२) आणि ड्वेन प्रिटोरियस (१३ चेंडूंत २९) यांनी आफ्रिकेला सावरले. मात्र, हे दोघे काही षटकांच्या अंतराने बाद झाल्यावर डसेन आणि मिलर यांनी १३१ धावांची भागीदारी रचत आफ्रिकेचा विजय साकारला.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २११ अशी धावसंख्या उभारली. इशान किशन (४८ चेंडूंत ७६) आणि ऋतुराज गायकवाड (१५ चेंडूंत २३) यांनी अर्धशतकी सलामी दिली. गायकवाड बाद झाल्यावर किशनला श्रेयस अय्यरची (२७ चेंडूंत ३६) साथ लाभली. त्यानंतर अखेरच्या षटकांत कर्णधार ऋषभ पंत (१६ चेंडूंत २९) आणि हार्दिक पंडय़ा (१२ चेंडूंत नाबाद ३१) यांनी फटकेबाजी करत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ४ बाद २११ (इशान किशन ७६, श्रेयस अय्यर ३६; वेन पार्नेल १/३२) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १९.१ षटकांत ३ बाद २१२ (रासी व्हॅन डर डसेन नाबाद ७५, डेव्हिड मिलर नाबाद ६४; अक्षर पटेल १/४०)