न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताची विजयी आघाडी; हर्षल पदार्पणात सामनावीर
मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने (२/२५) पदार्पणाच्या लढतीत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला़ त्यानंतर सलामीवीर के. एल. राहुल (४९ चेंडूंत ६५ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (३६ चेंडूंत ५५ धावा) यांनी शतकी भागीदारी रचल्यामुळे भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी आणि १६ चेंडू राखून धुव्वा उडवला.
न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने १७.२ षटकांत गाठून तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. उभय संघातील तिसरा सामना रविवारी कोलकाता येथे होणार आहे़. राहुल आणि रोहित यांनी सलग पाचव्या लढतीत किमान अर्धशतकी भागीदारी रचताना भारताच्या विजयाचा पाया रचला. राहुलने गेल्या पाच सामन्यांतील चौथे, तर रोहितने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. टिम साऊदीने या दोघांसह सूर्यकुमार यादवला (१) तीन षटकांच्या बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली. परंतु ऋषभ पंतने (६ चेंडूंत नाबाद १२) सलग दोन षटकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली. मार्टिन गप्टिल (३१) आणि डॅरेल मिचेल (३१) यांनी अवघ्या २६ चेंडूंत ४८ धावांची सलामी देत भारतावर दडपण टाकले. परंतु दीपक चहरने गप्टिलला बाद केल्यावर हर्षलने लढतीला कलाटणी दिली. त्याने मिचेल आणि ग्लेन फिलिप्स (३४) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. अक्षर पटेल (१/२६) आणि रविचंद्रन अश्विन (१/१९) या फिरकी जोडीनेसुद्धा मधल्या फळीत धावा रोखण्याची भूमिका चोख बजावली.