भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : सूर्यकुमारच्या शतकानंतरही भारतीय संघाचा पराभव

नॉटिंगहॅम : सूर्यकुमार यादवच्या (५५ चेंडूंत ११७ धावा) दिमाखदार शतकानंतरही भारतीय संघाला रविवारी तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून १७ धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र, पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळवल्याने पाहुण्या भारताने या मालिकेत २-१ अशी सरशी साधली.

इंग्लंडने दिलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा कर्णधार रोहित शर्मा (११), विराट कोहली (११) आणि ऋषभ पंत (१) लवकर बाद झाल्याने भारताची ३ बाद ३१ अशी स्थिती झाली. मग सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर (२८) या मुंबईकर फलंदाजांनी भारताचा डाव सावरताना चौथ्या गडय़ासाठी ११९ धावांची भागीदारी रचली. अय्यरला रीस टॉपलीने बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक साजरे केले. त्याने शतकी खेळीत १४ चौकार आणि सहा षटकार लगावले. मात्र, इतर फलंदाजांची त्याला फारशी साथ न लाभल्याने भारताला २० षटकांत ९ बाद १९८ धावाच करता आल्या.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ७ बाद २१५ अशी धावसंख्या उभारली. डेव्हिड मलान (३९ चेंडूंत ७७) आणि लियाम लििव्हगस्टोनने (२९ चेंडूंत ४२ धावा) आक्रमक खेळी केल्या.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ७ बाद २१५ (डेव्हिड मलान ७७, लियाम लिव्हिंगस्टोन ४२; रवी बिश्नोई २/३०) विजयी वि. भारत : २० षटकांत ९ बाद १९८ (सूर्यकुमार यादव ११७, श्रेयस अय्यर २८; रीस टॉपली ३/२२)

  • सामनावीर : रीस टॉपली