भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली ट्वेन्टी-२० क्रिकेट लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे आता शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळाच्या बळावरच यजमानांवर वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारतीय महिला संघातील खेळाडू मैदानात उतरतील.
एकदिवसीय संघातील स्थान गमावलेल्या जेमिमाने पहिल्या सामन्यात ३६ चेंडूंत नाबाद ४९ धावांची दमदार खेळी साकारली. तिच्यासह स्मृती मानधना, शफाली वर्मा यांची सलामीची जोडी आणि कर्णधार हरमनप्रीत कौरवर भारताच्या फलंदाजीची भिस्त असेल. अनुभवी झुलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत शिखा पांडे, पूजा वस्त्रकार वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. पहिल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या यास्तिका भाटिया आणि रेणुका सिंग यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.