निकालानंतर मंत्री उदय सामंत यांचा दावा
ठाणे: नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मुस्लिम समाजात तर संविधान बदलणार असे दलित समाजात गैरसमज निर्माण करून या दोन्ही समाजाच्या मतांमुळे इंडिया आघाडी यशस्वी झाली आहे, असा दावा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मात्र ज्या दोन समाजामुळे इंडिया आघाडीला यश मिळाले त्यांचा साधा उल्लेख देखील आघाडीच्या यशामध्ये करण्यात आला नसून केवळ मतांसाठीच या दोन समाजाचा वापर केला असल्याचा आरोप यावेळी सामंत यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या भाजपला निम्म्या जागा देखील गाठता आलेल्या नाहीत. त्यामुळे आता महायुतीच्या नेत्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. मंगळवारी लागलेल्या निकालानंतर बुधवारी मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टीका केली आहे. उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सात जागा आल्या आहेत. सर्वानी चांगले काम केले. महाराष्ट्रात अपेक्षित यशापर्यंत पोहचू शकलो नाही हे सत्य असले तरी इंडिया आघाडीला ज्यांच्यामुळे यश मिळाले त्या घटकांना ते विसरले असल्याचा आरोप सामंत यांनी यावेळी केला.
दोन समाजात गैरसमज पसरवण्यात इंडिया आघाडी यशस्वी झाली, त्यांनी मुस्लिम समाजात मोदींबद्दल गैरसमज निर्माण केले गेले,तर संविधान बदलणार असे दलित समाजात गैरसमज निर्माण केला. त्यामुळे कोणतीही मेहनत न घेता ही सर्व मते इंडिया आघाडीला मिळाली असल्याचा दावा सामंत यांनी यावेळी केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विचार केला तर सिंधुदुर्गात मुस्लिमांच्या मतांची संख्या फार कमी होती, ती रत्नागिरीत जास्त होती. ज्या ठिकाणी कमी होती त्या ठिकाणी नारायण राणे यांना ९९ हजार मताधिक्य होते. ज्या ठिकाणी मतांची संख्या जास्त होती त्या ठिकाणी इंडिया आघाडीला एक लाखांच्या मताधिक्याची अपेक्षा होती मात्र आम्ही त्यांना रोखल्याचे सामंत म्हणाले. सर्व जण एनडीएमध्ये तसेच राहणार असून त्यामुळे कोणी दिवास्वप्न बघू नये असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
येत्या आठ ते १५ दिवसांत पुन्हा मोठे इनकमिंग होणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. आणखी काही मंडळी आमच्या संपर्कात असून लवकरच मोठ्या संख्येने प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केवळ सकाळी पत्रकार परिषद घेतली जायची. मात्र मिळालेल्या थोड्या यशामुळे सकाळ दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषद घेतली जात असून आता रात्री आणि पहाटे देखील पत्रकार परिषद घ्यायला कमी करणार नाहीत असा टोला देखील त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सात जागा निवडून आल्या. सर्वानी चांगले काम केले. मतमोजणीचे फायनल निकाल आपण बघितले. अपेक्षित यश आम्हाला मिळाले नसले तरी, यश आणि अपयश याबाबत आत्मचिंतन केले जाईल, असे सामंत यांनी सांगितले. निवडणुकीत कोणी किती काम केले, सर्वांचे प्रगती पत्रक तपासले जाईल आणि युतीत काम केले की नाही त्या त्या पक्षाचे प्रमुख याबाबत निर्णय घेणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये नक्की काय झाले? भुजबळांनी काय नाही केले हे बोलण्या इतपत मी मोठा नसल्याचे सामंत म्हणाले.