राजकोट : अनुभवी दिनेश कार्तिकच्या (२७ चेंडूंत ५५ धावा) अप्रतिम अर्धशतकानंतर आवेश खानने (४/१८) केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारताने चौथ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ८२ धावांनी मात केली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली असून निर्णायक सामना रविवारी खेळवला जाईल.
शुक्रवारी राजकोट येथे झालेल्या सामन्यात भारताने केलेल्या १७० धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा डाव १६.५ षटकांत ८७ धावांतच आटोपला. रासी व्हॅन डर डसेन (२०), क्विंटन डीकॉक (१४) आणि मार्को यान्सेन (१२) या आफ्रिकेच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारताचा युवा वेगवान गोलंदाज आवेश खानला पहिल्या तिन्ही सामन्यांत एकही बळी मिळवता आला नव्हता. मात्र, त्याने या सामन्यात १८ धावांतच आफ्रिकेचे चार फलंदाज माघारी पाठवले. तसेच यजुर्वेद्र चहल (२/२१), हर्षल पटेल (१/३) आणि अक्षर पटेल (१/१९) यांनीही चांगली गोलंदाजी केली.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६९ अशी धावसंख्या उभारली. भारताच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. ऋतुराज गायकवाड (५) आणि श्रेयस अय्यर (४) झटपट माघारी परतले. इशान किशन (२७) आणि ऋषभ पंत (१७) हेसुद्धा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. यानंतर हार्दिक पंडय़ा (३१ चेंडूंत ४६) आणि कार्तिक यांनी पाचव्या गडय़ासाठी ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. हार्दिकचे अर्धशतक अवघ्या चार धावांनी हुकले. परंतु कार्तिकने ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना २७ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ६ बाद १६९ (दिनेश कार्तिक ५५, हार्दिक पंडय़ा ४६; लुंगी एन्गिडी २/२०) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : १६.५ षटकांत सर्वबाद ८७ (रासी व्हॅन डर डसेन २०; आवेश खान ४/१८, यजुर्वेद्र चहल २/२१)
- सामनावीर : दिनेश कार्तिक