भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका बरोबरीत आणणार?

शुक्रवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या रोमांचक पहिल्या टी-२० नंतर, दुसरी टी-२० (रविवार) पहिल्या डावानंतर पावसामुळे रद्द करण्यात आली. तीन सामन्यांच्या या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेने एका विजयासह आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मंगळवारी या मालिकेत दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने येतील.

 

आमने-सामने

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये भारताने नऊ तर दक्षिण आफ्रिकेने सहा जिंकले आहेत.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा चेत्री (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव, अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी

दक्षिण आफ्रिका: लॉरा वूल्फार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसन, मिके डी रिडर, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), मारिझान काप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, सुने लिस, एलिझ-मारी मार्क्स, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, क्लोई ट्रायॉन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

जेमिमाह रॉड्रिग्ज: भारताच्या मधल्या फळीतील या फलंदाजाने टी-२० मालिकेची सुरुवात एक अस्खलित अर्धशतक झळकावून केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात तिने सात चौकार आणि एका षटकारासह ३० चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. हे तिचे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधले ११वे अर्धशतक होते आणि आता ती या फॉरमॅटमध्ये २००० धावा करणारी चौथी भारतीय महिला फलंदाज बनण्यापासून फक्त तीन धावा दूर आहे.

दीप्ती शर्मा: ही ऑफ-स्पिनर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारतासाठी संयुक्तपणे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने चार षटकांत २० धावा देऊन दोन विकेट्स काढल्या, त्यात तझमिन ब्रिटस आणि मारिझान काप यांच्या मोठ्या विकेट्सचा समावेश होता. ती भारतासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज होती. गोलंदाजीशिवाय ती मधल्या फळीत बॅटसह योगदान करू शकते.

तझमिन ब्रिट्स: दक्षिण आफ्रिकेच्या या सलामीवीराने रविवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात आणखी एक अर्धशतक ठोकले. तिचे हे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधले ११वे अर्धशतक होते. पाच धावांवर असताना तिला जीवनदान मिळाले आणि त्यानंतर, या उजव्या हाताच्या फलंदाजाने सहा चौकार आणि एका षटकारासह ३९ चेंडूत एकूण ५२ धावा केल्या.

ॲनेके बॉश: दक्षिण आफ्रिकेच्या या ३० वर्षीय अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात बॅटने उपयुक्त योगदान दिले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने सहा चौकारांसह ३२ चेंडूत ४० धावा केल्या. नवव्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर तिने दक्षिण आफ्रिकेचा डाव एका बाजूने धरला. तिच्या फलंदाजीसोबतच ती चेंडूने उपयुक्त ठरू शकते.

 

खेळपट्टी

शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२०मध्ये ३५०हून अधिक धावा झाल्या. दुसऱ्या टी-२०मध्ये देखील, फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल दिसत होती. पावसाने खेळ रद्द करण्यास भाग पाडण्यापूर्वी पहिल्या डावाची धावसंख्या १७७ होती. चेन्नईच्या या खेळपट्टीवर धावांचा धो-धो पाऊस पडण्याची शक्यता आहे

 

हवामान

हवामान ढगाळ (९८% ढगांचे आच्छादन) आणि गडगडाटीचे असण्याची अपेक्षा आहे. सरासरी तापमान सुमारे २८ अंश सेल्सिअस असेल. पावसाची ६९% शक्यता आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ९ जुलै, २०२४

वेळ: सायंकाळी ७:०० वाजता

स्थळ: एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

प्रसारण: जियो सिनेमा, स्पोर्ट्स १८