नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात 410 धावा आणि सात गडी बाद वर केली. दीप्ती शर्मा (60*) आणि पूजा वस्त्राकर (4*) क्रीजवर असल्याने टीम इंडियाला 450 धावांचा टप्पा पार करायला आवडले असते. तथापि, इंग्लंडचे गोलंदाज लॉरेन बेल आणि सोफी एकलस्टन यांच्याकडे इतर योजना होत्या कारण त्यांनी दिवसाच्या खेळाच्या पहिल्या 40 मिनिटांत उर्वरित तीन विकेट्स घेत भारताला 104.3 षटकांत 428 धावांत गुंडाळले. ऑल आऊट होण्यापूर्वी भारताने 10.3 षटकांत फक्त 18 धावा केल्या.
62 वर फलंदाजी करत असेलेली शर्मा हिने एक संधी दिली परंतु शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या टॅमी ब्युमॉन्टने ती घेतली नाही. इंग्लंडच्या जखमांवर मीठ चोळत शर्माने पुढच्या चेंडूवर चौकार मारत तिच्या कसोटी कारकिर्दीतला सर्वोच धावसंख्येची (66) बरोबी केली. तथापि, ती फार काळ टिकली नाही. बेलने चेंडू थोडा पुढे टाकून शर्माला शॉर्ट खेळण्यास आमंत्रित केले आणि तिने फर्स्ट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या एकलस्टनला सोपा कॅच दिला. त्याचबरोबर शर्माचा 67 धावांचा डाव संपुष्टात आला. पहिल्या दिवशी फक्त एक विकेट मिळाली असून, एकलस्टनने बॉलसह अधिक चांगले प्रदर्शन करण्याचा निर्धार केला. तिने रेणुका सिंह ठाकूर विरुद्ध संधी निर्माण केली पण सिली पॉईंटवर उभ्या असलेल्या सोफिया डंकलेला तो झेल पकडता आला नाही. त्याच षटकात तिने ठाकूरला (1) क्लीन बोल्ड केले आणि नंतर राजेश्वरी गायकवाड (0) हिला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. वस्त्रकर 10 धावांसह दुसऱ्या टोकाला अडकून राहिले.
428 धावा करून भारताने महिला क्रिकेटमधील त्यांची दुसरी सर्वोच्च कसोटी धावसंख्या नोंदवली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांकडे खेळण्यासाठी भरपूर धावा होत्या. कसोटीमध्ये डेबू करणारी ठाकूर हिने भारतासाठी गोलंदाजीची सुरुवात केली. तिला तिची पहिली कसोटी विकेट घेण्यास जास्त वेळ लागला नाही. सोफिया डंकलेची (11) बॅट आणि पॅडमधील अंतरातून गेलेली तीक्ष्ण इनस्विंग चेंडू स्टंपवर कोसळला आणि भारताला डावाच्या तिसऱ्या षटकात पहिले यश मिळाले. भारताची दुसरी वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर देखील या मैफिलीत सामील झाली कारण तिने इंग्लंडची कर्णधार हेदर नाइट (11) हिच्या पहिल्याच षटकात पुन्हा इनस्विंग बॉलवर विकेट घेतली. पाहुण्यांनी फक्त 28 धावा केल्या होत्या आणि दोन गडी गमावले होते. 400 धावांनी ते पिछाडीवर होते.
नॅट सिव्हर-ब्रंट आणि टॅमी ब्युमॉन्ट यांनी 51 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्युमॉन्ट धावबाद झाल्याने इंग्लंड पुन्हा बॅकफूटवर गेले. कदाचित सिव्हर-ब्रंटने तिच्या मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्याच्या क्षेत्ररक्षण क्षमतेला कमी लेखले असेल कारण तिने चेंडू वस्त्रकारच्या उजवीकडे ढकलून एक झटपट एकल टाकण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटवर उभ्या असलेल्या वस्त्रकारने चेंडूवर आक्रमण केले आणि स्टम्प्सच्या दिशेने फेकून ते उडवले. 20 षटकांच्या आत तीन विकेट्स गमावल्याने इंग्लंड सर्व प्रकारच्या अडचणीत सापडला होता. पुढील फलंदाजीसाठी आलेल्या डॅनिएल वायट (19) हिने काही आश्वासने दाखवली परंतु दीप्ती शर्माने स्पेलच्या पहिल्याच षटकात तिला बाद केले. बराच वेळ हवेत असेलेल्या चेंडूने वायटची बॅट आणि पॅड घेतला आणि शॉर्ट लेगवर जेमिमा रॉड्रिगीजच्या हातांत जाऊन सापडला. सिव्हर-ब्रंट तिच्या आजूबाजूला पडणाऱ्या विकेट्समुळे निराश झाली असेल परंतु लढत देत तिने आपले चौथे कसोटी अर्धशत पूर्ण केले.
पाहुण्यांनी 108 धावांत चार विकेट गमावल्या पण पुढच्या 28 धावांत सहा विकेट्स गमावून त्यांचा डाव 35.3 षटकांत 136 वर आटोपला. शेवटच्या सहा विकेटपैकी, दीप्ती शर्माने चार विकेट घेतल्या आणि 5.3 षटकात (ज्यात चार मेडन्सचा समावेश होता) फक्त सात धावा देऊन तिने पाच विकेट्स पटकावल्या. कसोटी क्रिकेटमध्ये हा तिचा पहिला पाच विकेट हॉल होता. पाच विकेटपैकी एमी जोन्सची विकेट इंग्लंडसाठी खूपच दुर्दैवी ठरली. जोन्सने थेट शॉर्ट लेगला उभी असलेली स्मृती मानधनाकडे मारला. चेंडू तिच्या हेल्मेटला लागून हवेत उडाला आणि नंतर लेग स्लिपमध्ये उभी असलेली शफाली वर्माच्या हातात जाऊन बसला. अनेकदा असे म्हटले जाते की फलंदाज आणि गोलंदाज जोडीने शिकार करतात परंतु या प्रकरणात भारताची सलामीची जोडी एका संधीचे शानदार झेलमध्ये रूपांतर करण्यासाठी एकत्र आली. शर्माला चांगली साथ दिली स्नेह राणाने जिने सिव्हर -ब्रंटच्या मोठ्या विकेटसह दोन गडी बाद केले. भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडच्या 10 पैकी सात विकेट घेतल्या.
दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, तज्ञांनी सांगितले कि खेळपट्टीत पहिल्या दिवशीपेक्षा कमी उसळी असेल आणि गोलंदाजांना त्यांची लेन्थ समायोजित करावी लागेल. त्यानुसार दोन्ही संघांनी चांगली गोलंदाजी केली. दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या तीन भारतीय विकेट्स मिळविण्यात लक्षणीय कामगिरी केली आणि नंतर भारताने इंग्लंडला बाद करण्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले.
292 धावांची शानदार आघाडी घेत, भारताने पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी इंग्लंडवर फॉलोऑनची सक्ती केली नाही. काही तासांनंतर इंग्लंडने पुन्हा एकदा कडक उन्हात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावे लागले. भारताचा पुन्हा फलंदाजीचा निर्णय दोन घटकांवर आधारित असू शकतो; खेळपट्टीच्या बदलत्या स्वरूपामुळे चौथ्या डावात (इंग्लंडने भारतासमोर लक्ष्य उभे केले असे गृहीत धरून) त्यांना वळणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी करायची नसेल आणि दुसरे म्हणजे, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २१ ते २४ डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटीपूर्वी, त्यांना त्यांच्या फलंदाजांना अधिक सराव द्यायचा असेल.
वर्मा आणि मानधना (२६) या भारताच्या सलामीच्या जोडीने नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात करून दिली. त्यांची 61 धावांची भागीदारी एकलस्टनने 13 व्या षटकात मानधनाला बाद करून तोडली. वर्मा (33) आणि या डावात तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या यास्तिका भाटिया (9) जिने पहिल्या डावात 66 धावा ठोकल्या होत्या यांना अनुक्रमे चार्ली डीन आणि एकलस्टन यांनी 16व्या आणि 17व्या षटकात झटपट बाद केले. डीनने भारताचे अधिक नुकसान केले जेव्हा तिने जेमिमाह रॉड्रिग्स (27), दीप्ती शर्मा (20) आणि स्नेह राणा (0) यांना तंबूत परत पाठवले. रॉड्रिग्स आणि शर्मा यांनी पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते परंतु या डावात एका चांगल्या सुरुवातीला मोठ्या स्कोरमध्ये रूपांतर करू शकले नाहीत.
दिवसाच्या खेळाच्या अखेरीस कर्णधार हरमनप्रीत कौर (44 नाबाद) आणि पूजा वस्त्राकर (17 नाबाद) यांनी भारताला अजून कुठलेही नुकसान होऊ दिले नाही. भारताने 292 च्या आघाडीवर 186 धावांची भर घालून एकूण आघाडी 478 पर्यंत नेली. इंग्लंडसाठी या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिले कार्य भारताला बाद करणे (भारताने डाव घोषित न केल्यास) आणि नंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सर्वोत्तम फलंदाजी करणे हे असेल. सामन्याला निर्णय लागण्याची दाट शक्यता आहे. भारताचा विजय जवळजवळ निश्चितच आहे जर इंग्लंडने कोणताही चमत्कार घडवून आणला नाही.