भारतीय महिला क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची पहिली एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत ०-२ च्या फरकाने पिछाडी वर असलेला भारत तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. या सामन्यात जर भारताला विजय प्राप्त झाला तर नक्कीच त्यांचा आत्मविश्वास वाढेल जो त्यांना येणाऱ्या टी-२० मालिकेत उपयोगी पडेल. एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया ५ जानेवारीपासून तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत.
शनिवारी दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याच्या अगदी जवळ आल्यावर (भारताने हा सामना ३ धावांनी गमावला), यजमानांना जोरदार कमबॅक करावा लागेल खासकरून क्षेत्ररक्षण विभागात कारण त्यांना त्या सामन्यात सात झेल पकडता आले नाही. “कॅचेस विन मॅचेस” असे क्रिकेटमध्ये म्हटले जाते आणि भारताने ते न पकडल्यामुळे सामना गमावला.
झालेल्या चुका सुधारण्याचा ध्येय ठेवून भारतीय महिला ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळायला सज्ज आहेत.
संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, हरलीन देओल
ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, जेस जोनासन, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांविरुद्ध ५२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने ४२ जिंकले आहेत, तर भारताला फक्त १० जिंकता आले आहेत. भारतात ऑस्ट्रेलियाने २३ पैकी १९ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने केवळ एकात विजय मिळवला आहे.
भारत | ऑस्ट्रेलिया | |
आयसीसी एकदिवसीय रँकिंग | ४ | १ |
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | १० | ४२ |
भारतात | ४ | १९ |
शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये | १ | ४ |
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
दीप्ती शर्मा: या भारतीय अष्टपैलू खेळाडूने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बॅट आणि बॉलने मौल्यवान योगदान दिले. तिने १० षटकात ३८ धावा देऊन पाच गडी बाद केले. ती तिच्या संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज होती. हा तिच्या एकदिवसीय करीअरमधला दुसरा पाच विकेट हॉल देखील होता. त्याचबरोबर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या डावखुऱ्या फलंदाजाने ३६ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या.
ऋचा घोष: भारताच्या या यष्टिरक्षक-फलंदाजाने या मालिकेपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कधीच फलंदाजी केली नव्हती. मात्र, या मालिकेत तिला संधी देण्यात आली आणि तिने त्या संधीचे सोने केले (खासकरून दुसऱ्या सामन्यामध्ये). पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिने २० चेंडूत २१ धावा केल्या आणि दुस-या एकदिवसीय सामन्यात ११७ चेंडूत ९६ धावांची सुंदर खेळी केली. हा तिचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम स्कोर होता. या प्रक्रियेत तिने जेमिमा रॉड्रिग्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारीसुद्धा केली.
अॅनाबेल सदरलँड: या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बॅट आणि बॉलने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार जिंकला. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या उजव्या हाताच्या फलंदाजाने २९ चेंडूत २३ धावा केल्या. नंतर, मध्यमगती गोलंदाजी करून तिने नऊ षटकांत ४७ धावा दिल्या आणि तीन विकेट्स पटकावल्या. ती तिच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली.
फीबी लिचफिल्ड: या २० वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाजाने भारताविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये एकामागोमाग अर्धशतकं झळकावली आहेत. दुसऱ्या सामन्यात या सलामीवीराने ९८ चेंडूत ६३ धावांची संयमी खेळी केली. तिचा डाव सहा चौकारांनी सजला होता. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तिला दोन जीवदान दिले आणि तिने त्या संधींचा पुरेपूर फायदा करून घेतला.
खेळपट्टी
या ठिकाणी आजपर्यंत आठ महिला एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी समान (चार-चार) सामने जिंकले आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना येथे होणार आहे. येथे झालेल्या याआधीच्या सामन्यात ५०० हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यात केलेल्या धावसंख्येपेक्षा त्या कमी होत्या. वानखेडेवरील लाल मातीच्या खेळपट्ट्यांवर चेंडू असमान उसळी घेतो म्हणून फलंदाजी करणे तितके सोपे नाही. याशिवाय, मागील एकदिवसीय सामन्यात पडलेल्या १६ विकेट्स पैकी ११ विकेट्स फिरकी गोलंदाजांनी पटकावल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची भूमिका महत्वाची असेल.
हवामान
हवामान बहुतांशी सूर्यप्रकाशित राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. २% ढगांचे आच्छादन असेल. पावसाची शक्यता नाही. उत्तर-वायव्येकडून वारे वाहतील.
माइलस्टोन अलर्ट
- हरमनप्रीत कौरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९३ धावांची गरज आहे
- दीप्ती शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ४३ धावांची गरज आहे आणि १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: २ जानेवारी, २०२४
वेळ: दुपारी १.३० वाजता
स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई
प्रसारण: जिओ सिनेमा