कसोटी नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायला तयार

२१ ते २४ डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलिया महिलांवर आठ गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात हरवून इतिहास रचला. दोन्ही संघ आता पुन्हा त्याच ठिकाणी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायला तयार आहेत. भारत आपला चांगला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल तर ऑस्ट्रेलियाचा कडवी झुंझ देण्याचा निर्धार असेल.

काय भारत ऑस्ट्रेलियाला (ज्या संघाने भारतासमोर कधीही एकदिवसीय मालिका गमावली नाही) मजबूत लढत देऊ शकेल? मालिकेची सुरुवात २८ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, स्नेह राणा, हरलीन देओल

ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, जेस जोनासन, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी , मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम

 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांविरुद्ध ५० एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने ४० विजयांसह वर्चस्व गाजवले आहे, तर भारत फक्त १० जिंकू शकला आहे. भारतामध्ये, २१ पैकी १७ एकदिवसीय सामने जिंकल्यामुळे हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आहे. अलीकडील आकडेवारीवरूनही ऑस्ट्रेलियाची भारतावर मजबूत पकड असल्याचे सूचित होते कारण त्यांनी पाचपैकी चार सामने जिंकले आहेत.

  भारत ऑस्ट्रेलिया
आयसीसी एकदिवसीय रँकिंग
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने १० ४०
भारतात १७
शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये

 

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

हरमनप्रीत कौर: भारताची कर्णधार सर्वाधिक धावा करणारी आणि संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने १२७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने ३३९३ धावा केल्या आहेत. तिच्या नावावर १८ अर्धशतके आणि पाच शतके आहेत ज्यात २०१७ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ नाबाद या सर्वोच स्कोरचा समावेश आहे. तिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करायला आवडते. त्यांच्याविरुद्ध तिने १४ डावांत ५१ च्या सरासरीने धावा ठोकल्या आहेत, जो तिच्यासाठी कोणत्याही प्रतिपक्षाविरुद्ध सर्वोच्च आहे. तिच्या फलंदाजीव्यतिरिक्त, ती ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यासाठी हात फिरवू शकते. तिने ३१ विकेट्स घेतल्या आहेत.

दीप्ती शर्मा: भारताची ही शानदार अष्टपैलू महिला एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जगात सहाव्या क्रमांकावर आहे. जवळपास एक दशकापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेली दीप्ती ८३ एकदिवसीय सामने खेळली आहे. या डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने ३५ च्या सरासरीने १९१२ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एक डझन अर्धशतकांचा समावेश आहे. चेंडूसह, या ऑफस्पिनरने ९३ विकेट्स काढल्या आहेत, ज्यात दोन फोरफर आणि एक फायफर आहेत. ती डावाच्या कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी करू शकते.

ताहलिया मॅकग्रा: या ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधाराने २१ ते २४ डिसेंबर दरम्यान भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीत तिच्या संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने दोन डावांमध्ये दोन अर्धशतके झळकावली आणि भारतातील महिला कसोटीत हा पराक्रम गाजवणारी पहिली फलंदाज बनली. तिचे एकदिवसीय रेकॉर्ड पाहता तिने १९ डावात दोन अर्धशतकांसह ४१२ धावा केल्या आहेत. ती चेंडूसह सुद्धा योगदान देऊ शकते. उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत तिने २५ डावात २२ विकेट्स काढल्या आहेत.

बेथ मुनी: ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज ही महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची फलंदाज आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने ५८ डावात तीन शतके आणि १४ अर्धशतकांसह २१३७ धावा केल्या आहेत. ती ५३ च्या दमदार सरासरीने आणि ८६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करते. भारताविरुद्ध खेळताना तिची सरासरी ८६ वर उसळी मारते. तिने भारताविरुद्ध सात डावांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३४३ धावा केल्या आहेत.

 

खेळपट्टी

या ठिकाणी सहा महिला एकदिवसीय सामने आयोजित केले गेले आहेत ज्यात शेवटचा सामना फेब्रुवारी २०१९ मध्ये खेळला गेला होता. प्रथम आणि द्वितीय फलंदाजी करणाऱ्या संघांनी समान संख्येने सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या ३०० आणि सर्वात कमी ७९ आहे. योगायोगाने ही सर्वोच्च आणि सर्वात कमी धावसंख्या अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारताने १४ मार्च २०१२ रोजी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात नोंदवली होती. अलीकडील आकडेवारी पाहता, या दोन संघांनी येथे एक कसोटी सामना खेळला. अधूनमधून कमी आणि असमान बाउन्समुळे फिरकीपटूंसाठी परिस्थिती अनुकूल होती. तथापि, फलंदाजांनी क्रीजवर वेळ घालवला आणि परिस्थिती समजून घेतल्यास ते सहज धावा करू शकतात.

 

हवामान

हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. ४५% ढगांचे आच्छादन असेल आणि पावसाची शक्यता नाही. ईशान्येकडून वारे वाहतील.

 

माइलस्टोन अलर्ट

दीप्ती शर्माला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ८८ धावांची गरज आहे

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २८ डिसेंबर २०२३

वेळ: दुपारी १.३० वाजता

स्थळ: वानखेडे स्टेडियम, मुंबई

प्रसारण: जिओ सिनेमा