पाकिस्ताननंतर काय आता भारत युएईवर करणार मात?

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सात विकेट्स राखून विजय मिळविल्यानंतर, गतविजेता भारत रविवारी रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महिला टी-२० आशिया चषकातील पाचव्या सामन्यात यूएईशी लढण्यासाठी सज्ज आहे. भारताने आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली आहे, तर युएईला नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

 

आमने-सामने

भारत आणि युएई एकमेकांविरुद्ध एक टी-२० सामना खेळले आहेत आणि तो सामना भारताने जिंकला आहे.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन

युएई: ईशा ओझा (कर्णधार), कविशा एगोडागे, रिथिका रजिथ, समायरा धरणीधारका, लावण्या केनी, एमिली थॉमस, हीना होटचंदानी, मेहक ठाकूर, इंधुजा नंदकुमार, रिनिथा रजिथ, खुशी शर्मा, रिषीथा रजिथ, सुरक्षा कोट्टे, तीर्था सतीश, वैष्णवी महेश

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

स्मृती मानधना: भारताच्या या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तिने ३१ चेंडूत ४५ धावांची जबरदस्त खेळी केली ज्यात नऊ चौकारांचा  समावेश होता. धावांचा पाठलाग करताना तिने तिची सलामीची जोडीदार शफाली वर्मासोबत ८५ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली.

दीप्ती शर्मा: टी-२० आयसीसी रँकिंग्समध्ये अष्टपैलूंच्या यादीत तिस-या क्रमांकावर असलेल्या या गोलंदाजाने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात चार षटकांत २० धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला. नियमितपणे विकेट्स पटकावण्याकरिता विकेट घेण्यासाठी भारत या ऑफ स्पिनरवर अवलंबून असेल. तिच्या गोलंदाजीबरोबरच ती एक उत्कृष्ट मधल्या फळीतील फलंदाज आहे.

खुशी शर्मा: यूएईच्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने नेपाळविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या ज्यात दोन चौकारांचा समावेश होता. तिने नवीन चेंडूने एक षटक देखील टाकले.

कविशा एगोडागे: या यूएईच्या अष्टपैलू खेळाडूने नेपाळविरुद्धच्या तिच्या शेवटच्या चकमकीत बॅट आणि चेंडूने उपयुक्त योगदान दिले. बॅटने, तिने दोन चौकारांसह २६ चेंडूत २२ धावा केल्या आणि बॉलसह, ऑफ स्पिन गोलंदाजी करत, चार षटकात (त्यात एका मेडनचा समावेश होता) १२ धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या.

 

खेळपट्टी

या मैदानावर हा स्पर्धेतील पाचवा सामना असेल. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानी चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. स्पिनर्सचे आतापर्यंतच्या स्पर्धेत वर्चस्व राहिले आहे. याशिवाय, हवेशीर वातावरणामुळे मध्यमगती गोलंदाजांना मदत झाली आहे. खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असली तरी, गोलंदाजांनी प्रभावित केले आहे.

 

हवामान

हवामान हवेशीर आणि आल्हाददायक असेल. तापमान २९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. ६७% दाट ढगांच्या आच्छादनासह पावसाची फक्त ३% शक्यता आहे.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: २१ जुलै 2024

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डंबुला

प्रसारण: डिस्नी + हॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स