“…म्हणून भारत विरुद्ध पाकिस्तान सामना भारतात आयोजित करणं कठीण”, सौरव गांगुली

टी-२० वर्ल्डकपचं नियोजन सुरू झाल्यापासून तमाम भारतीयांना आणि तेवढीत पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना देखील उत्सुकता आहे ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. येत्या रविवारी अर्थात २४ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यासंदर्भात देशात सध्या राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत असताना हा सामना होऊ नये, अशी देखील प्रतिक्रिया येत आहे. मात्र, हा सामना होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर असा सामना भारतात आयोजित करणं फार कठीण काम असल्याची प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं दिली आहे.

यंदाच्या टी-२० क्रिकेट वर्ल्डकपची सुरुवात भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याने होत आहे. याविषयी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, “भारत-पाकिस्तान सामन्याने वर्ल्डकपची सुरुवात काही पहिल्यांदाच होत नाहीये. २०१५मध्ये देखील आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने सुरुवात केली होती. कदाचित २०१९मध्ये ते शक्य होऊ शकलं नाही, पण चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात आणि अंतिम सामना पुन्हा पाकिस्तानसोबतच झाला”!

भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की सगळ्यांवरच प्रचंड दडपण असल्याचं दिसून येतं. पण सौरव गांगुलीचं मात्र मत वेगळं आहे. “लोकं म्हणतात की भारत-पाकिस्तान सामन्याचं प्रचंड दडपण असतं. पण मला ते कधीच जाणवलं नाही. जेव्हा मी खेळत होतो, तेव्हाही मला ते जाणवलं नाही. जेव्हा पहिल्यांदा मी बंगाल क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष झालो, तेव्हा २०१६च्या वर्ल्डकपमधला सामना इडन गार्डन्सवर झाला. एक आयोजक म्हणून तो माझा पहिला सामना होता”, असं गांगुली म्हणाला.

“सामना आयोजित करणं फार अवघड”

भारत-पाकिस्तान सामन्याविषयी बोलताना सौरव गांगुलीनं एक आयोजक म्हणून असलेलं दडपण सांगितलं. “या खेळामध्ये लोकांना खूप रस आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या प्रत्यक्ष दबावापेक्षा तो भारतात आयोजित करणं फार कठीण आहे. कारण इथे तिकिटांसाठी फार मागणी असते. भारतात या सामन्याकडे असंख्य लोकांचं लक्ष असतं. पण तसं इथे दुबईत नाहीये. त्यामुळे इथे हा सामना आयोजित करणं तुलनेनं सोपं आहे”, असं गांगुली म्हणाला.