उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी राजकोट येथे इंग्लंडचा ४३४ धावांच्या विक्रमासह पराभव करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. राजकोटचाच रहिवाशी असलेला रवींद्र जडेजा याचा भारताच्या विजयात सिंहाचा वाटा होता. त्याने बॅट आणि चेंडूने केलेल्या अमूल्य योगदानासाठी सामनावीराचा पुरस्कार पटकावला. जडेजाने या कसोटीत एकदा फलंदाजी करून ११२ धावा ठोकल्या तर दोन डावांमध्ये गोलंदाजी करून सात बळी घेतले.
४३४ धावांचा विजय हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय आणि इंग्लंडसाठी दुसरा सर्वोच्च पराभव आहे. तिसरी कसोटी चौथ्या दिवशी संपली आणि पुढचा कसोटी सामना या दोन संघांमध्ये रांची येथे फेब्रुवारी २३ ते २७ या दरम्यान खेळवण्यात येईल. या मालिकेत आणखी दोन कसोटी सामने शिल्लक असताना, इंग्लंडचा कर्णधार, बेन स्टोक्स याने, सामन्यानंतरच्या सादरीकरणात, मजबूत पुनरागमन करण्याचा आणि मालिका जिंकण्याचा आत्मविश्वास दाखवला.
भारताने चौथ्या दिवसाची सुरुवात ३२२ धावांच्या भक्कम आघाडीसह केली आणि त्यांच्या आठ विकेट्स शिल्लक होत्या. त्यांनी आणखी दोन गड्यांच्या मोबदल्यात २३४ धावांची भर घातली आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ५५७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवला. तिसऱ्या दिवशीचे नाबाद फलंदाज शुबमन गिल आणि कुलदीप यादव हे रविवारी मात्र बाद झाले. एकीकडे ९१ धावा करून गिल दुर्दैवाने धावबाद झाला, तर यादवने २७ धावा करून नाईट वॉचमन म्हणून त्याची जबाबदारी छान प्रकारे पार पाडली.
नंतर, मुंबईचे दोन फलंदाज, यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान, ज्यांनी वैयक्तिकरित्या ९० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या, त्यांनी पाचव्या विकेटसाठी १५८ चेंडूत १७२ धावांची शानदार भागीदारी केली. जैस्वाल (२१४ नाबाद) ने सुंदर शैलीत मालिकेतील त्याचे दुसरे द्विशतक पूर्ण केले आणि सरफराजने (६८ नाबाद) त्याच्या पहिल्या कसोटीतच दोन सलग अर्धशतक झळकावले.
इंग्लंडला धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जवळजवळ अशक्य अशी धावसंख्या भारताने उभारली आणि नंतर त्यांच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४० षटकांच्या आत गुंडाळले. जडेजाने ४१ धावा देऊन पाच गाडी बाद केले आणि तो भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याचबरोबर यादव आणि जसप्रीत बुमराह, ज्यांनी पहिल्या डावात दोन आणि एक विकेट्स घेतल्या होत्या, त्यांनी दुसऱ्या डावातही तेवढ्याच विकेट घेतल्या. रविचंद्रन अश्विन, जो कौटुंबिक कारणामुळे या कसोटीचा तिसरा दिवस खेळू शकला नाही, त्याने एक विकेट घेऊन चौथ्या दिवशी आपली हजेरी लावली.
भारतीय गोलंदाजांच्या विपरीत, इंग्लंडच्या फलंदाजांचा दिवस विसरण्यासारखा होता. इंग्लंडच्या निम्म्याहून अधिक खेळाडू दुहेरी अंकात धावा करू शकले नाहीत. त्यांचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता मार्क वूड जो संघात एक गोलंदाज म्हणून खेळतो. वूडने 15 चेंडूत 33 धावांची आक्रमक खेळी केली.
इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत एक मोठा पराभव पत्करावा लागला. तीनपैकी दोन सामने गमावल्यानंतर हे अगदी स्पष्ट होत आहे कि त्यांची क्रिकेटची बाझबॉल शैली भारतात सकारात्मक निर्णय देऊ शकत नाही आहे. उरलेल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड आपली शैली बदलून पारंपारिक कसोटी क्रिकेट खेळेल की बाझबॉल प्रमाणेच खेळेल?