ठाणे: ठाणे महापालिकेतील ८८० पदांना मंजुरी देण्यात आल्याच्या वृत्ताने प्रशासकीय वर्तुळात आणि बेरोजगार घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पालिकेचा आस्थापना खर्च ३८ टक्क्यांवर गेल्याने आरोग्य विभागाची पदे सोडून इतर विभागातील पदे धोक्यात आली आहेत, त्यामुळे नोकरभरतीच्या आनंदावर विरजण पडले आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील २०१५ ते मे २०१८ पर्यंत ६६६ हून अधिक कर्मचारी, वरीष्ठ कर्मचारी यांच्यासह अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. यांची पोकळी भरुन काढण्यासाठी पालिकेने ६३९ पदे ही सरळ सेवेने भरली होती. परंतु शहराची वाढणारी लोकसंख्या आणि महापालिकेचा वाढता कामाचा व्याप लक्षात घेता, महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या ही अपुरी ठरत आहे. मागील काही वर्षापासून ठाणे महापालिकेत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या पध्दतीने कर्मचारी सेवा निवृत्त होत आहे, त्यापध्दतीने भरती मात्र होतांना दिसत नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेने २० जुलै २०१६ रोजी महासभेत ठराव केला होता. त्यानंतर १ ऑक्टोबर २०१६ रोजी हा आकृतीबंधाचा ठराव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. अखेर या आकृतीबंधाला शासनाने २०१९ मध्ये मंजुरी दिली आणि पहिल्या टप्यात ६८२ पदांना मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता पुन्हा ८८० पदांना मंजुरी देण्यात आली आहे. परंतु आता मंजुर करण्यात आलेल्या आकृतीबंधात आरोग्य सेवेतील ७७८ पदे असून दोन पदे उपायुक्तांची होती. उर्वरीत पदांना मात्र मंजुरी अद्यापही मिळू शकलेली नाही.
ठाणे महापालिकेच्या सेवेत १० हजार ३३ पदे मंजुर असून त्यातील ६ हजार ३९६ पदे भरण्यात आली आहेत. तर नव्या आकृती बंधात २१०० पदांची मागणी करण्यात आली होती. त्यातील केवळ ८८० पदांना मंजुरी मिळाली आहे. तर आजही तब्बल ३ हजार ८३६ पदे रिक्त आहेत. यामध्ये महापालिकेतील महत्वाची पदांचा समावेश . मात्र ही पदे भरत असतांना महापालिका आस्थापनेचा खर्च हा ३५ टक्यांपेक्षा कमी असावा लागतो. मात्र ठाणे महापालिकेचा आस्थापनेचा खर्च हा ३९ टक्के असल्याने नवीन पदांना मंजुरी मिळेल का नाही? या बाबत मात्र पालिका अधिकारी साशंक आहेत.
अशी आहेत रिक्त पदे
वर्ग १ – १३०
वर्ग २ – १२४
वर्ग ३ – १७९५
वर्ग ४ – १८७५