ठाणे : ठाणे जिल्ह्याचे कमाल तापमान ३८ ते ४० अंशावर पोहोचले असून लहानग्यांसह ज्येष्ठांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने सिव्हील रुग्णालयात २५ खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष सर्व यंत्रणांनी सुसज्ज ठेवण्यात आला आहे.
सूर्यदेवाने रौद्ररूप धारण केल्याने काही दिवसांपासून तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे. सकाळी नऊनंतर उन्हाच्या झळा बसतात तर दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे सर्वांसाठी त्रासदायक ठरत आहे. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्याचे कमाल तापमान ३८ ते ४० अंशावर पोहोचले आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हील रुग्णालय सज्ज आहे. रुग्णालयात २५ खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
या वर्षीचा उष्मा अधिक तीव्र असल्याचे भाकित हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे. उकाडा वाढल्यामुळे थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी लक्षणे आढळतात.
महत्वाचे काम असल्यास तरच दुपारच्या उन्हात बाहेर पडावे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावेहलकी, पातळ सूती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्याप्रमाणे रुग्णशय्या वाढवण्यात येतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.