नजीब मुल्ला यांची ७८ कोटींची मालमत्ता
ठाणे : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता गेल्या पाच वर्षांत १२८ कोटींनी वाढली असून ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्या कर्जात वाढ झाली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांची संपत्ती ७८ कोटी एवढी असल्याचे सत्यप्रतिज्ञापत्रावरून कळते.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक यांची संपत्ती पाच वर्षात १२८ कोटींनी वाढली असून त्यांच्यावर १९५ कोटींचे कर्ज देखील असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात जाहीर केले आहे.
सरनाईक यांनी अर्ज दाखल करतांना सोबत प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची एकूण संपत्ती १४३ कोटी ९७ लाख १८,७४५ एवढी होती. त्यानंतर आता त्यांची संपत्ती २७१,१८,३९,६४७ एवढी दाखविण्यात आली आहे.
सरनाईक यांच्याकडे सध्या रोख रक्कम आठ लाख १७,९६२ रुपये, पत्नीकडे १६ लाख ४४,६०६ रुपये आहेत. सरनाईक यांच्याकडे जंगम मालमत्ता ५६ कोटी ३० लाख ९७,२८३ रुपये तर पत्नीकडे ४४ कोटी ३८ लाख ५५,४६६ रुपये किमतीची जंगम मालमत्ता आहे.
सरनाईक यांच्याकडे २१४ कोटी ९७ लाख ४२,३६४ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असून पत्नीकडे १७६ कोटी ६० लाखांची स्थावर मालमत्ता आहे. सरनाईक यांच्यावर १९४ कोटी ४३ लाख २३,७०९ रुपये तर त्यांच्या पत्नीवर ५५ कोटींहून अधिक कर्ज आहे. सरनाईक यांच्याकडे १० लाख ४० हजारांचे शेअर्स तर २२ लाख ५० हजारांचे सोने आहे.
ठाणे मतदारसंघातील उध्दव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विचारे यांच्या संपत्तीत गेल्या पाच महिन्यांत वाढ किंवा घट झालेली नाही.
लोकसभेच्या निवडणुकीत सहा महिन्यांपूर्वी त्यांची संपत्ती २५ कोटी ८२ लाख ९७ हजार होती. विचारेंवरील कर्जाची रक्कम वाढली असून त्यांच्याकडील रोख रक्कम २० हजारांनी कमी झाली.
राजन विचारे यांच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे हुंदाई वेरणा, पत्नी नंदीनीच्या नावे
इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ असून रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन आहे.
ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड, दिघे चौकात दुकान, मीरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान आहे.
मुंब्रा कळव्याचे अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नजीब मुल्ला यांच्यावर सात गुन्हे दाखल असून, दहा कोटी ३५ लाखांचे कर्ज आहे. त्यांची एकूण संपत्ती सात कोटी १२ लाख ७१ हजार ४० एवढी आहे. त्यांची स्थावर मालमत्ता ७१ कोटी ५ लाख ६३ हजार ९३४ एवढी आहे.
नजीब मुल्ला यांच्यावर सात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे टोयोटा फोरच्युनर नर, रॉयल इनफिल्ड, मारुती कियाझ ही वाहने आहेत.
कोकणातील खेड येथे जमीन असून हिरानंदानी इस्टेट येथे फ्लॅट, वाणिज्य गाळे, राबोडी येथे घर आहे.