लहरी वातावरणामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णात वाढ

नवी मुंबई: दिवसा कडक उन आणि रात्री थंड वातावरण असा बदल झाला आहे. सोबतच रात्रीचे वायू प्रदूषण असून या वातावरणाचा फटका बसून शहरात सर्दी खोकला आणि तापाच्या रुग्णात वाढ होत आहे. लहान मुलांना हा आजार पटकन होत असल्याने त्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

नवी मुंबई शहरातील वातावरणात अचानक झालेला बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध व्याधींचा सामना करावा लागत आहे. अचानक घसा बसण्याच्या आणि खवखवण्याच्या आणि सर्दी खोकला, तापाच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील अनेक नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांकडे रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. प्राथमिक उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. घशात दुखणे किंवा जळजळ होणे पदार्थ गिळताना त्रास होणे, घसा खवखवण्याच्या कारणांनी बोलताना त्रास होत असल्याने अनेकांचा आवाज बसला आहे. गरम अन्नामुळे जळजळ होणे, तोंड खूप कोरडे होणे किंवा तोंड उघडे ठेवून झोपणे यांचा समावेश होतो.

बदलत्या वातावरणाचा अधिक परिणाम १ ते १२ वर्षाच्या आतील मुलांवर अधिक जाणवत असून त्याच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात डिसेंबर २०२२ मध्ये ३२११, जानेवारी २०२४ मध्ये ३४३८ व फेब्रुवारी २०२४ मध्ये ३२२२ लहान मुलांवर औषधोपचार करण्यात आले असून त्यात सर्वधिक व्हायरल आजाराचे रुग्ण होते, अशी माहिती मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

मनपा दवाखान्यात ओपीडीमध्ये नोंद होणाऱ्या विशेषतः १ ते १२ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्दी खोकलाचे रुग्ण अधिक दिसून येत आहेत. यात नागरीकांनी घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्याने औषध उपचार घ्यावेत, असे डॉ.अश्फाक सिद्दीकी यांनी सांगितले.