कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा, घोडबंदरमध्येही शिवसेनेला धक्का
ठाणे : ठाणे भाजपामध्ये अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचे `इनकमिंग’ सुरूच असून, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत तीन माजी नगरसेवक आणि एका समाजसेविकेने भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला. वागळे इस्टेट, वर्तकनगर पाठोपाठ भाजपाने घोडबंदर रोड पट्ट्यातही शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. या पक्षप्रवेशावेळी भूमिपूत्रांच्या पाठीशी भाजपा हा एकमेव उभा असल्याचे भाजपाच्या नेत्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व सध्या शिवसेनेचे उपशहर संघटक असलेले संजय तांडेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक शिवाजी मौळे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्यासह विक्रांत तांडेल यांनी, तर कोपरीत समाजसेविका सुचित्रा गणेश भोईर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कोपरी व घोडबंदर रोडवर शनिवारी झालेल्या प्रवेश सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, नगरसेविका अर्चना मणेरा, किरण मणेरा, शहर सरचिटणीस विलास साठे, मोलॉय बक्षी, राम ठाकूर आदींची उपस्थिती होती. यापूर्वी शिवसेनेच्या किसननगर नं. २ मधील शाखाप्रमुखाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वर्तकनगरमध्येही शिवसैनिकांनी भाजपाचा झेंडा खांद्यावर घेतला. आता घोडबंदर रोडवरील तीन माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. भाजपामध्ये लवकरच शीळ फाट्यातील कार्यकर्तेही प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच आमदार संजय केळकर यांनी केल्यामुळे शिवसेनेची गळती कायम राहणार असल्याची शक्यता आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने भूमिपूत्रांवर कायम अन्याय केला. त्याचा आता हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन श्री. केळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
माजी खासदार रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांनी जोपासलेला ठाणे हा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ आपल्याला तहात गमवावा लागला. मात्र, आता महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभा पुन्हा जिंकू या, असे आवाहन राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. केंद्र सरकारकडून ठाणे शहराला स्मार्ट सिटी अन्वये कोट्यवधींचा निधी दिला गेला. मात्र, त्याबाबत उल्लेख केला जात नाही. यापूर्वी आपण ठाण्यातील दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत म्हाडाच्या कार्यक्रमात असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी केंद्र सरकारचा उल्लेख पाहण्यात आला. आगामी काळात अशी परिस्थिती निर्माण करावी, की ते नाव देण्यासाठी आपला महापौर असावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
दिबांच्या नावासाठी वेळप्रसंगी कायद्यात बदलाचा आग्रह : कपिल पाटील
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यायलाच हवे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला भाजपाचा विरोध नाही. मात्र, भाजपाकडून २०१६ मध्येच दिबांच्या नावाची मागणी करण्यात आली होती. भूमिपूत्रांच्या भावनांचा सन्मान राखायला हवा. त्यासाठी वेळप्रसंगी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावेत, अशी आग्रही भूमिका केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे भूमिपूत्रांच्या शिष्टमंडळाने केली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.