आमदार सरनाईक आणि आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी
ठाणे : केंद्र आणि राज्य सरकार, ठाणे महानगरपालिका, ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नागला बंदर खाडीलगत विकसित करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुखच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण रविवार, १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली.
गायमुख येथे, स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंतर्गत येथे सुमारे ८०० मीटरची लांबी असलेल्या या चौपाटीवर जेट्टी, गणेश विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट, खाडीलगत पादचाऱ्यांसाठी पदपथ, रस्त्यालगत पदपथ, मियावाकी उद्यान, आसनव्यवस्था, ॲम्फी थिएटर, वाहन पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृहे, विद्युत रोषणाई आणि सीसीटीव्ही आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.
दशक्रिया विधी घाट येथे सध्या बांधण्यात आलेली शेड अपुरी आहे. ती मोठी असावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी असल्याचे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यानुसार, वाढीव शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. त्यामुळे ठाणेकरांना फिरण्यासाठी, कौटुंबिक सहलीसाठी एक चांगली व्यवस्था तयार झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ही सगळ्यात मोठी चौपाटी ठरणार आहे. त्यानुसार, या चौपाटीचा विकास करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त राव यांनी सांगितले.
त्याचबरोबर, नागला बंदर येथेच आरमाराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून हा नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटचा तिसरा टप्पा असेल. त्याचे भूमिपूजनही मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीही आयुक्त राव यांनी दिली.
या पाहणी दौऱ्यात, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त दिनेश तायडे आणि मनोहर बोडके, सहाय्यक नगररचना संचालक संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, संजय कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदी अधिकारी उपस्थित होते.
नागला बंदर नाक्यानजिक होत असलेल्या सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या जागेची तसेच, कासारवडवली येथील विविध समाज भवनांच्या इमारतीची पाहणीही आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली.
मुख्यमंत्री महोदय हे सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत. हे सर्वधर्मीयांचे स्मृती वन असेल. त्यात काही कारणाने विलंब झाला असला तरी आता हे काम मार्गी लागेल, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.