जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांना पीपीई किट
ठाणे: वंचित आणि मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे सांगितले.
देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सूरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र सिंह यांच्यासह देशाच्या विविध राज्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे समन्वयक श्री. लालखोलेन, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा जिल्हाधिकारी कार्यालय समन्वय अधिकारी समाधान इंगळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.बाबासाहेब राजळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश मंचाल, आयुष्यमान भारत अभियानाचे ठाणे जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र जगतकर, महात्मा फुले विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक आरती रंबन, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापक वंदना राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्ह्यातील काही सफाई कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात पीपीई किट आणि आभा कार्डचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी तळागाळातील नागरिकांचा सन्मान होतोय, वंचितांच्या मूलभूत गरजा भागविताना त्यांना शासनाकडून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक लाभ दिले जात आहेत, याचे समाधान मिळत आहे, या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्ह्यात आयुष्यमान कार्डचे उद्दिष्ट 15 लाख 21 हजार 484 इतके होते. त्यापैकी 51 टक्के म्हणजेच 7 लाख 82 हजार 636 इतके उद्दिष्ट पूर्ण झाले असून ठाणे जिल्हा राज्यात 4 थ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती आयुष्यमान भारत अभियानाचे ठाणे जिल्हा समन्वयक डॉ. रविंद्र जगतकर यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले. डॉ. चारुलता धानके यांनी सूत्रसंचलन तर आभार प्रदर्शन आरती रंबन यांनी केले.