चार दिवसांत ३३ लाखांचा दंड वसूल
ठाणे : दुचाकी आणि चार चाकी वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचा लावणाऱ्या ७५० वाहनचालकांसह सुमारे साडेसात हजार वाहनचालकांच्या विरोधात चार दिवस विशेष मोहीम राबवून ठाणे वाहतूक पोलिसांनी ३३ लाखांचा दंड वसूल केला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने मागील चार दिवस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालक यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. वाहनांच्या नंबर प्लेटवर मामा, दादा, भाई अशी चमकोगिरी करणाऱ्या २१४ आणि चार चाकी वाहनांच्या काचांवर काळी फिल्म लावणाऱ्या ५३४जणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून चलन फाडण्यात आले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७,५६८ बेशिस्त वाहनचालकांकडून ३३ लाख ४९,१०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात विना हेल्मेट, बेदरकारपणे गाडी चालविणे, सिग्नल मोडणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहनचालक यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली होती तर काळ्या काचा लावून अनेक गुन्हेगार आपली ओळख लपवत होते. फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांमुळे सीसीटीव्हीमध्ये गाडीचे नंबर व्यवस्थित दिसत नाहीत, त्यामुळे ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान काचांवरील काळी फिल्म काढून टाकण्यात आली तसेच दंड देखील वसूल करण्यात आला, अशी माहिती पोलीस उपायुक्त श्री. पाटील यांनी दिली. अशा प्रकारची मोहीम यापुढे देखील अशीच सुरू राहणार आहे. वाहनचालक यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.