भाव २००वरून ८० रुपयांपर्यंत गडगडला
ठाणे : स्वयंपाक घरात बटाटा, पावभाजी आणि मसालेभात यांच्यासोबत ऐटीत मिरवणाऱ्या मटार अर्थात हिरव्या वाटाण्याची आवक वाढली आहे, परिणामी दर कमालीचे घसरले आहेत.
राज्यात अहमदनगर, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातील पश्चिम घाटाला लागून असलेल्या पठारी भागात, कमी तापमानाच्या ठिकाणी पावसाळ्यानंतर मटारचे उत्पादन घेतले जाते. आठवड्याभराआधी २०० रुपये किलोने विकला जाणारा मटार आता ८० रुपये किलोने मिळत आहे. राज्याच्या चारही बाजूने मटारची आवक असल्याने सध्या मटारचे दर कमी झाले आहेत. पंजाब, मध्य प्रदेशातील रतलाम आणि कर्नाटक येथून वाशी मार्केट, कल्याण मार्केट येथे मटारचा पुरवठा होतो. मटारचे भाव जरी वाढले असले तरी मागणी मात्र स्थिर आहे.
हिरव्या वाटाण्याचा वापर मुख्यत मटार पुलाव, पावभाजी, आलू मटार, मटार पराठा या खाद्यपदार्थामध्ये आणि पदार्थावरील ‘टॉपिंग’साठी केला जातो. वाटाणा पीक हे साधारण एक ते दीड फूट उंचीपर्यंत आणि अतिशय नाजूक असते. थंड वातावरणात या पीकाचे उत्पादन घेतले जाऊ शकते. हिरवा वाटाणा राज्याबाहेरून येत असल्या कारणाने आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे वाटण्याची किंमत २०० रुपये किलो होती. आता वाटाणा ८० रुपये किलो असून पुढच्या काही दिवसात वाटण्याचे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे.