ठाणे: भारत-पाक सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, जिल्ह्यातील सर्व महापालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे जिल्ह्यातील नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे, महत्वाच्या इमारती आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्ह्यातील विविध भागात मॉक ड्रील आयोजित करून कोणत्याही अप्रिय घटनेचा सामना करण्यासाठी तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशांवर प्रशासनाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. भारत-पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ठाणे जिल्हा प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे, असे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त केले आहे.