आगामी काळात मनसे महापालिकांच्या सत्तेत

* राज ठाकरे यांचा विश्वास
* ठाण्यात मनसेचा १७वा वर्धापन दिन

ठाणे : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सत्तेत असेल, असा विश्वास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७वा वर्धापन दिन सोहळा ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे झाला. या सोहळ्यात श्री. ठाकरे बोलत होते. राज्यातील जनतेच्या विविध प्रश्नांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मनसेमुळे मोबाईलवर मराठी संभाषण ऐकण्यास मिळाले, दुकानावर मराठी पाट्या आल्या, मशिदीवरील भोंगे काढण्याचे आंदोलन केले. राज्यातील ६५ टोलनाके बंद केले. राज्यात जेवढी आंदोलने मनसेने केली तेवढी आंदोलने कुठल्याही पक्षाने केली नाहीत. नाशिक महापालिकेत सत्तेत असताना विकास केला तसा विकास अद्याप कोणी केला नाही, त्यामुळे मनसेने केलेले काम नागरिकांपर्यंत पोहचवा, त्यांच्यात विश्वास निर्माण करा, त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना पक्षाचे काम सांगा असा कानमंत्र त्यांनी देऊन महापालिका निवडणुका कधी होतील याबद्दल शंका उपस्थित करून जेव्हा निवडणूका होतील तेव्हा आपण सत्तेत असू, असा विश्वास व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे ते, महाराष्ट्राला खड्ड्यात घेऊन जाणारे आहे. जो महाराष्ट्र देशाचे प्रबोधन करायचा त्याच राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मनसेच्या संकेतस्थळाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. मनसेच्या कार्याची माहिती देणारी डिजिटल पुस्तिका देखिल प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेचे वाचन करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी श्री. ठाकरे यांनी त्यांना प्रश्न विचारणाऱ्या काही पत्रकारांच्या विरोधात देखील तोफ डागली. इलेक्ट्रॉनिक मीडियाने राज्यातील काही लोकं वायफळ बोलतात त्यांचे बोलणे दाखवणे बंद केले तर महाराष्ट्र सुधारेल, असे म्हणाले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.