आमदार संजय केळकर यांनी कोकण पट्टा काढला पिंजून
ठाणे : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराने महापालिका क्षेत्रात वेग घेतला असतानाच भाजपा नेते आणि ज्येष्ठ आमदार यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यात अवघी कोकण पट्टी पिंजून काढली. कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी डावखरे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी बैठका, सभा, मेळावे आणि भेटीगाठीतून केले.
आमदार संजय केळकर यांनी तीन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेण, माणगाव, गोरेगाव, महाड, दापोली चिपळूण, देवरूख, रत्नागिरी येथे शिक्षक आणि पदवीधरांचे मेळावे घेऊन मतदारांना आवाहन केले. विशेष म्हणजे वैयक्तिक आणि घरोघरी जाऊनही त्यांनी प्रचार केला. एक टर्म पदवीधर मतदार संघाचे आमदार आणि दोन टर्म विधानसभेचे आमदार अशा मोठ्या कारकीर्दीत त्यांनी ठाणे शहरासह ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या कामांचा फायदा त्यांना या दौऱ्यात झाला.
केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असून पुढील काळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. त्याच बरोबर पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून कोकणातील पदवीधर आणि शिक्षकांच्या विकासासाठी भाजपचे निरंजन डावखरे यांना पहिल्या फेरीतच विजयी करा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले.
श्री.केळकर यांनी पदवीधर मतदारांबरोबरच शिक्षकांच्या समस्यादेखील सोडवण्याबाबत आश्र्वासित केले. संचमान्यता, शालेय गणवेश, वैद्यकीय बिले, बी.एल.ओ. जबाबदारी, जिल्हांतर्गत बदली, मुख्यालय आदी अनेक मुद्द्यांवर ठोस कार्यवाही करण्याचे सांगितले. मत बाद होऊ नये यासाठी मतदारांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या दौऱ्यात श्री.केळकर यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, विजय पवार, वैभव कांबळे, उदय गायकवाड, भाजपचे केदार साठे, अनिकेत कानडे आदी उपस्थित होते.
या दौऱ्यात विविध शिक्षक संघटनांनी संजय केळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाठिंबा जाहीर केला.