* ३४० परीक्षा केंद्र आणि सहा भरारी पथके तैनात
ठाणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या १ मार्चपासून सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यात ३४० परीक्षा केंद्रांवर एक लाख २१,०२२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी सहा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.
मागील वर्षी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यात ३३२ परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील एक लाख १६,५४२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, ठाणे जिल्ह्यातील एक लाख २१,०२२ विद्यार्थी ३४० परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. यापैकी ग्रामीण भागात ६० तर महापालिका क्षेत्रात २८० परीक्षा केद्रे असणार आहेत.
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तर ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश असून, महिला विशेष पथकाचा समावेश असणार आहे. जिल्हा पोलिस प्रशासनास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.
यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नाही अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
मनपा /तालुका परीक्षा केंद्र
ठाणे मनपा ७४
नवी मुंबई मनपा ४२
कडोंमपा ८६
कल्याण ग्रामीण ०२
उल्हासनगर मनपा २२
अंबरनाथ २१
मुरबाड ११
शहापूर ०९
भिवंडी मनपा ३५
भिवंडी ग्रामीण १७
मीरा-भाईंदर २१
एकूण ३४०